CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये वाढतोय ब्रेन हॅमरेजसारख्या आजारांचा धोका; रिपोर्टमधून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 02:32 PM 2021-07-25T14:32:03+5:30 2021-07-25T14:53:39+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा सर्वच देशांत उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 19 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका पुन्हा एकदा वाढत आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे.
रविवारी (25 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 39,742 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 535 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली.
गेल्या आठवड्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद इंडोनेशियामध्ये झाली असून 3,50,273 नवे रुग्ण आहेत. ब्रिटनमध्ये 2,96,447 नवे रुग्ण, ब्राझीलमध्ये 2,87,610 नवे रुग्ण, भारतामध्ये 2,68,843 नवे रुग्ण, अमेरिकेमध्ये 2,16,433 नवे रुग्ण आढळून आले.
मास्क, सोशल डिस्ंटसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. अशातच रिपोर्टमधून नवनवीन माहिती समोर येत आहे.
कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यविषयीच्या आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दिल्लीतील एका रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमधून याबाबत दावा केला आहे. कोरोनातून ठीक झाल्यानंतर रुग्णांमध्ये न्यूरोल़ॉजिकल समस्यांचा अधिक घातक स्वरूपात वाढत असल्याचं दिसून येत आहे.
दिल्लीतील मूलचंद रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्यात ब्रेन हॅमरेज आणि अनेक गंभीर समस्या वाढत आहेत. डॉक्टरांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
रुग्णालयातील सीनियर न्यूरोसर्जन डॉ. आशा बक्शी यांनी 37 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी सारखी लक्षणं दिसून येत आहेत. तर 26 टक्के रुग्णांमध्ये चव समजत नसल्याचं समोर आलं आहे.
आरोग्यविषयीच्या या समस्यांमुळे रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यचे प्रमाण वाढत आहे. कोरोना व्हायरस हा फक्त फुफ्फुसाचा आजार नाही तर न्यूरोलॉजिकल समस्या देखील असल्याचं डॉक्टर बक्शी यांनी म्हटलं आहे.
ओपीडीमध्ये येणारे जवळपास 60 टक्के रुग्णांना तणाव, एकटेपणा आणि आत्महत्या करण्याचे विचार सतावत आहेत. यातील अनेक रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मूलचंद रुग्णालयाने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
डब्ल्यूएचओ साथीच्या आजाराबाबत दर आठवड्याला देत असलेल्या माहितीमध्ये डेल्टा व्हायरसच्या संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याचा विविध देशांचा प्रयत्न असला तरी विविध देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
गेल्या आठवड्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद इंडोनेशियामध्ये झाली असून 3,50,273 नवे रुग्ण आहेत. ब्रिटनमध्ये 2,96,447 नवे रुग्ण, ब्राझीलमध्ये 2,87,610 नवे रुग्ण, भारतामध्ये 2,68,843 नवे रुग्ण, अमेरिकेमध्ये 2,16,433 नवे रुग्ण आढळून आले.
20 जुलैपर्यंत कोरोनाचे 24 लाख नमुने जिनोमिक माहितीसाठी पाठविण्यात आले. त्यातील दोन लाख 20 हजारांहून अधिक नमुने डेल्टा प्रकाराचे असल्याचे दिसले. डेल्टामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन, डेन्मार्क, भारत, इंडोनेशिया, इस्राईल, पोर्तुगाल, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन या देशांमध्ये ‘डेल्टा’चा प्रभाव 75 टक्क्यांहून अधिक असल्याचं दिसलं आहे.
डेल्टामुळे कोरोनाच्या इतर प्रकारांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असून येत्या काळात डेल्टाचाच प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. जगभरात अल्फा प्रकारचे विषाणू 180 देशांत, बीटा प्रकारचे विषाणू 130 देशांत, गॅमा प्रकारचे 78 देशांत, तर डेल्टा प्रकारचे 124 देशांत रुग्ण नोंदविले गेले आहेत.