CoronaVirus Updates: देशात नव्या ३७ हजार ५६६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:34 AM2021-06-29T11:34:17+5:302021-06-29T11:39:03+5:30

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ९०७ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले.

देशभरात गेल्या २४ तासांत ३७ हजार ५६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०३ लाख १६ हजार ८९७ वर पोहचली आहे. देशात सध्या ५ लाख ५२ हजार ६५९ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ९०७ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले. देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ९७ हजार ६३७ वर पोहचली आहे.

राज्यात सोमवारी ६ हजार ७२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, १०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख १७ हजार ८७४ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१२,०८,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,४३,५४८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,८३९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी, तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आज १० हजार ८१२ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ५८ लाख ९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के इतके आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून, आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे सांगितले.

एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण सोमवारी मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून, सध्या जरी बेड्स रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर्समधील बेडची संख्या वाढविण्यासोबतच चार नवीन कोविड सेंटरही सुरू केली जाणार आहेत. मालाड जम्बोसह दुसऱ्या टप्प्यामध्ये कांजूरमार्ग, सायन, वरळी रेसकोर्स ही नवीन जम्बो सेंटर सुरु केली जाणार आहेत. तर नेस्को, रिचर्डसन ऍण्ड क्रूडास भायखळा आणि एनएससीआयमधील बेडची संख्या वाढवली जात आहे.