CoronaVirus Updates: देशात नव्या 39 हजार 796 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 10:23 AM2021-07-05T10:23:02+5:302021-07-05T10:31:19+5:30

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत 2 कोटी 97 लाख 00 हजार 430 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशभरात गेल्या 24 तासांत 39 हजार 796 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 05 लाख 85 हजार 229 वर पोहचली आहे. देशात सध्या 4 लाख 82 हजार 071 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 43 हजार 352 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत 2 कोटी 97 लाख 00 हजार 430 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील जनतेसाठी पुन्हा एकदा काहीसे चिंता वाढवणारे वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी 3 हजार 378 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 95.91 टक्क्यांवर गेला आहे. तर, रविवारी राज्यांत एकूण 9 हजार 336 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी राज्यांत 9 हजार 336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत 123 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 3 हजार 378 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 58 लाख 48 हजार 693 रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण 1 लाख 23 हजार 225 आहे. तर, रविवारी 38 मनपा क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यात एकूण 4 कोटी 25 लाख 42 हजार 943 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 60 लाख 98 हजार 177 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात 6 लाख 38 हजार 004 जण गृह विलगीकरणात आहेत. तर, 4 हजार 198 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत रविवारी केवळ 548 नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत 705 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. रविवारी दिवसभरात मुंबईत 24 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 15 हजार 544 इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 8 हजार 114 उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून, रुग्णवाढीचा दर 0.08 टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी 767 दिवसांवर गेला आहे.