CoronaVirus Updates: देशात नव्या ७ हजार ५७९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:10 AM 2021-11-23T11:10:53+5:30 2021-11-23T11:40:00+5:30
राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. देशभरात गेल्या २४ तासांत ७ हजार ५७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात १२ हजार २०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या देशभरात १ लाख १३ हजार ५८४ जणांवर उपचार सुरु आहेत. देशात सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ८,४८८ रुग्ण आढळले तर २४९ जणांचा मृत्यू होता. गेल्या ५३८ दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची ही संख्या सगळ्यात कमी आहे.
राज्यात दररोज सरासरी ५०० ते ८०० रुग्ण सापडत असल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले. डिसेंबर अखेर राज्यातील सर्वांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट असून, केंद्राच्या ‘हर घर दस्तक’ आणि ‘मिशन कवच कुंडल’ यातून हे डोस दिले जात असल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील १० ते २० या वयोगटांतील एक हजारपेक्षा अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे पुढे आले आहे. ही बाब गंभीर असून, त्यांच्यापासून घरातील ज्येष्ठांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता ज्येष्ठांना बूस्टर डोस देणे गरजेचे आहे. तशी विनंती आपण केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढली आहे. परंतु, असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे टोपे म्हणाले. ११ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. यासह ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे, असे टोपे म्हणाले.