CoronaVirus Updates: नवा व्हेरिअंट ‘ओमीक्रॉन’ डेल्टासोबत मिसळला तर...; भारतासाठी वैज्ञानिकांचा गंभीर इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 01:17 PM 2021-11-27T13:17:10+5:30 2021-11-27T13:28:39+5:30
New Corona Variant found: भारतात आधीपासूनच 69 टक्क्यांहून अधिक गंभीर व्हेरिअंट आहेत. त्यात सर्वात जास्त डेल्टा आहे. अशा परिस्थितीत हा नवा व्हेरिअंट भारतात दाखल झाला तर चिंतेचे असणार आहे. दक्षिण आफ्रिकेसह चार देशांमध्ये कोरोना व्हायरसचे आजवरचे वेगाने पसरणारे रुप समोर आल्याने भारतीय वैज्ञानिकांच्या चिंता वाढल्या आहेत. या व्हेरिअंटने कमी काळात तीस हून अधिक म्युटेशन केले आहेत. यामुळे हा व्हेरिअंट जर भारतात आला तर मोठा धोका उद्भवू शकतो असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओने या व्हेरिअंटला खूप वेगाने पसरणारे चिंताजनक स्वरुप असे म्हटले आहे. या व्हेरिअंटला ग्रीकमध्ये ‘ओमीक्रॉन’ नाव देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांनंतर ही पहिल्यांदा डब्ल्यूएचओने वर्गीकरणाची घोषणा केली आहे. डेल्टा व्हेरिअंटदेखील या वर्गामध्ये होता.
यामुळे कोरोनाचा b.1.1.529 व्हेरिअंट जर डेल्टासोबत मिसळला आणि दोन्ही व्हेरिअंटची एकाचवेळी लागण सुरु झाली तर देशासमोर गंभीर संकट उत्पन्न होऊ शकते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. सध्या तरी अशाप्रकारच्या मिश्रणाचे कोणतेही प्रकार समोर आलेले नाहीत. परंतू याआधीच्या व्हेरिअंटमध्ये तसे घडले होते. काही रुग्णांना दोन्ही व्हायरसची लागण झाली होती.
कोरोनाचा b.1.1.529 व्हेरिअंट सापडल्याची घोषणा गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या वैज्ञानिकांनी केली होती. आता हा व्हेरिअंट अन्य दोन देश इस्त्रायल आणि बेल्जिअममध्येही सापडला आहे. हाँगकाँगमध्येही एक रुग्ण सापडला आहे. यापैकी इस्त्रायलमध्ये तर बुस्टर डोस घेतलेला रुग्ण सापडला आहे.
भारतात अद्याप कोरोना लसीचा दुसरा डोस अनेकांना मिळालेला नाही. यामुळे कोरोनाचा हा नवीन व्हेरिअंट भारतात येऊ नये, भारतात प्रवेश करू नये यासाठी कठोर उपाययोजना करायला हव्यात असे भारतीय वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
दिल्ली स्थित काउंसिल ऑफ साइंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआईआर) चे इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटीग्रेटिव बायोलॉजी (आईजीआईबी) चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. विनोद स्कारिया यांनी आपले मत नोंदविले आहे. पहिल्यांदाच या व्हायरसमध्ये 32 वेळा म्युटेशन झाले आहे. व्हायरसच्या स्पाईक रचनेमध्ये सर्वाधिक बदल झाले आहेत. यामुळेच ब्रेक थ्रू इन्फेक्शन (लस घेणे किंवा पुन्हा कोरोना संक्रमित होणे) चे रुग्ण सापडत आहेत.
डॉ. स्कारिया यांच्यानुसार आता वेट अँड वॉचचा वेळ गेला आहे. आता अॅक्शन घेण्याची वेळ आहे. सावध राहण्याची गरज आहे. लसीकरण आणि आरोग्याशी निगडित उपाय तातडीने करण्याची गरज आहे. या नव्या व्हेरिअंटची आणखी माहिती मिळण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल.
नवी दिल्ली स्थित इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ललित कुमार यांनी म्हटले की, भारतात आधीपासूनच 69 टक्क्यांहून अधिक गंभीर व्हेरिअंट आहेत. त्यात सर्वात जास्त डेल्टा आहे. अशा परिस्थितीत हा नवा व्हेरिअंट भारतात दाखल झाला तर डेल्टामध्ये कसा मिसळेल, हे विज्ञानालाही अद्याप शोधता आलेले नाही.
नवीन प्रकाराबाबत शुक्रवारी शास्त्रज्ञांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, सध्या होम क्वारंटाईनवर सर्वाधिक भर दिला जात आहे, मात्र या तीन देशांव्यतिरिक्त संशयित रुग्णांना विमानतळावरच क्वारंटाईन सेवा मिळावी, जेणेकरून नवीन व्हेरिअंटच्या प्रवेशाबाबत कोणतीही शंका राहू नये.