coronavirus: ग्रामीण भागात अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायतीमधून होणार लसीकरण, SMSच्या माध्यमातून मिळेल माहिती By बाळकृष्ण परब | Published: November 7, 2020 11:54 AM 2020-11-07T11:54:04+5:30 2020-11-07T12:33:22+5:30
corona Vaccine Update : कोरोनावरील लस भारतात उपलब्ध झाल्यानंतर तिच्या वितरणाची तयारी वेगाने सुरू आहे. त्यासाठी सरकारकडून तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या गटाने एक ब्लूप्रिंट तयार केला आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. दुसरीकडे कोरोनावरील लस भारतात उपलब्ध झाल्यानंतर तिच्या वितरणाची तयारी वेगाने सुरू आहे. त्यासाठी सरकारकडून तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या गटाने एक ब्लूप्रिंट तयार केला आहे.
कोरोनाची लस कशी, कधी आणि कुणाला द्यायची याची माहिती या ब्लू प्रिंटमध्ये आहे. व्यापक स्तरावर लसीकरण करता यावे यासाठी शाळा, अंगणवाडी केंद्र आणि ग्रामपंचायतीच्या इमारतींचा वापर लसीकरण केंद्र म्हणून करण्याची तयारी सरकारकडून करण्यात येत आहे.
कोविड-१९ विरोधात एक विशेष लसीकरण मोहीम चालवली जाईल. ही मोहीम बहुतकरून पूर्वीपासून सुरू असलेल्या सार्वभौमिक लसीकरण कार्यक्रमासारखे असेल. केंद्र सरकार कोरोना लसीसाठी eVIN प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. त्यासाठी यामध्ये सुधारणा केली जात आहे. आज आपण जाणून घेऊया कोरोना लस सर्वामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारकडून कशाप्रकारे नियोजन सुरू आहे त्याबाबत.
केंद्र सरकार लस खरेदी करणार, मग राज्यांना देणार अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार कोरोनावरील लसीची थेट खरेदी करून राज्यांना देईल. त्यानंतर राज्य आणि जिल्हा पातळीवरील व्यवस्थेच्या मदतीने प्राधान्यक्रमावरील व्यक्तींना लस दिली जाईल. तसेच प्राधान्याच्या आधारावर ही लस मोफत देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
प्राधान्यक्रमाच्या यादीमध्ये चार गटात वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ५० वर्षांवरील व्यक्ती आणि अखेरीस इतर आजारांशी झुंजत असलेल्या व्यक्तींना लस दिली जाईल.
राज्यांकडून केली जाणार लसीकरण केंद्रांची निश्चिती लसीकरण केंद्र म्हणून वापरण्यात येणाऱ्या इमारतींची निश्चिती राज्य सरकारकडून केली जाईल. यामध्ये केवळ केवळ हेल्थकेअर फॅसिलिटीज नाही तर ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी केंद्र यांच्या इमारतींचाही कोरोना लसीकरण केंद्रासाठी वापर केला जाणार आहे.
eVIN च्या माध्यमातून अशा प्रकारे होणार काम आरोग्य मंत्रालयाकडे इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क म्हणजेच eVIN सारखा डिजिटल प्लॅटफॉर्म आधीपासूनच उपलब्ध आहे. eVIN च्या माध्यमातून सर्व कोल्ड चेन पॉईंट्समध्ये व्हॅक्सिनचा स्टॉक आणि स्टोरेज टेम्प्रेचरची रियल-टाइम माहिती मिळते. ही व्यवस्था यूआयपीसाठी वापरण्यात येत आहे. आता कोविड व्हॅक्सिनसाठी तिला अधिकी अद्ययावत बनवण्यात येत आहे. नवीन अपडेटमध्ये लोकांना एक मेसेज पाठवला जाईल, ज्यामध्ये तारीख, वेळ आणि जागा सांगितली जाईल. जिथे कोविडची लस देण्यात येईल. याशिवाय eVIN शी डिजिटली कनेक्ट होण्याशिवाय व्हॅक्सिन घेणाऱ्यांना ट्रॅकसुद्धा केले जाऊ शकेल.
आधारच्या माध्यमातून कळेल लसीकरण झाले आहे की नाही लसीकरणाच्या यादीत नोंद करून व्यक्तीला तिच्या आधाराशी लिंक केले जाईल. त्यामुळे डुप्लिकेसीची शक्यता राहणार नाही. तसेच कुणाला लस देण्यात आली आहे आणि कुणाला देण्यात आलेली नही याची माहितीही या माध्यमातून ट्रॅक करता येईल. जर कुणाकडे आधार कार्ड नसेल तर तर कुठल्याही अन्य ओळखपत्राचा वापर करता येईल.
पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस देण्याची तयारी भारताकडे संपूर्ण देशातील सर्व जिल्ह्यांत मिळून २८ हजार व्हॅक्सिन स्टोरेज सेंटर्स आहेत. हे सर्व सेंटर्स eVIN शी संलग्न आहेत. आता लॉजिस्टिक्स मॅनेज करण्याच्या कामात किमान ४० हजार फ्रंटलाइन वर्कर्स गुंतले आहेत. स्टोरेजचे तापमान चेक करण्यासाठी किमान ५० हजार टेम्प्रेचर लॉगर्स आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२१ च्या जुलै महिन्यापर्यंत प्राथमिकतेच्या आधारावर २५ ते ३० कोटी नागरिकांना कोरोना विरोधातील लस दिली जाईल.