CoronaVirus:लढ्याला यश! देशात Covaxinनंतर कोरोनावरच्या दुसऱ्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरू By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 01:09 PM 2020-07-15T13:09:11+5:30 2020-07-15T13:39:04+5:30
लस उपलब्ध झाल्यानंतर देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आजकाल भारतात कोरोना लशीविषयी बरीच चर्चा आहे. भारत सरकारच्या माहितीनुसार कोरोना लस पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत येऊ शकते.
लस उपलब्ध झाल्यानंतर देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कोवॅक्सिननंतर आणखी एका दुसऱ्या स्वदेशी कोरोना लशीच्या मानवी चाचण्या सुरू झाल्या आहेत.
भारतीय औषधी कंपनी झायडस कॅडिला यांनी बुधवारी सांगितले की, त्यांनी संभाव्य कोरोना लशीसाठी मानवी चाचण्या सुरू केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या बाबतीत जगात तिस-या क्रमांकावर असलेल्या भारतात संसर्ग झपाट्याने वाढत आहे.
झायडस कॅडिला यांनी सांगितले की, प्लास्मिड डीएनए लस सुरक्षित मानली जाते. तत्पूर्वी या कोरोना लसीच्या चाचण्यांमध्ये प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
झायडस कॅडिला त्याच्या मानवी चाचण्यांमध्ये 1000 हून अधिक लोकांचा समावेश करणार आहे. यासाठी भारतात अनेक क्लिनिकल रिसर्च सेंटर स्थापन केली गेली आहेत.
यापूर्वी 2 जुलैला भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' (COVAXIN) नंतर हैदराबादची औषध कंपनी झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडने कोरोना लस बनवण्याविषयी सांगितले होते.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)ने झायडस कॅडिलाला लसीच्या मानवी चाचणीस मान्यता दिली आहे.
याद्वारे झायडस कॅडिला ही मानवावरील चाचण्यांना परवानगी मिळणारी देशातील दुसरी कंपनी बनली आहे. अलीकडे हैदराबादच्या भारत बायोटेकला अशा प्रकारच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली.
15 ऑगस्ट रोजी भारताची पहिली कोरोनावरची लस येणार बाजारात जर सर्व काही ठीक झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यापासून कोरोनाच्या लशीची घोषणा करू शकतात.
आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या भागीदारीतून विकसित केलेल्या या लशीची प्राण्यांवरची चाचणी यशस्वी ठरली आहे.
सध्या तिची मानवी चाचणी सुरू आहे. आयसीएमआरने चाचण्याकरिता निवडलेल्या सर्व संस्थांना काटेकोरपणे सूचना दिल्या आहेत.
त्याचे पालन निश्चित वेळेत करण्यात यावे जेणेकरून लस लवकरात लवकर सुरू करता येईल. जर ही लस 15 ऑगस्ट रोजी लाँच केली गेली तर जगातील कोरोनाची ही पहिली लस असेल.