इंजिनीयरला २ वर्षात नाही जमले, दुसरी पास व्यक्तीनं १० दिवसांत केले; ३७०० किलोची घंटा बांधली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:13 AM2022-03-29T11:13:23+5:302022-03-29T11:20:56+5:30

तब्बल ३७०० किलो वजनाची घंटा दुसरी पास असलेल्या मुस्लिम व्यक्तीनं केवळ १० दिवसांत बसवली

मध्य प्रदेशच्या पशुपतीनाथ मंदिरात ३७०० किलो वजनाची घंटा बसवण्यात आली आहे. ही देशातील सर्वात वजनदार घंटा असल्याचं बोललं जात आहे. घंटा तयार करण्यासाठी लोकांनी तांबे आणि पितळ दान केलं होतं.

भाविकांनी दिलेल्या तांबे आणि पितळेच्या जुन्या भांड्यांपासून घंटा तयार करण्यात आली. त्यासाठी जवळपास ३ वर्षे लागली. गेल्या २ वर्षांपासून घंटा मंदिर परिसरात ठेवण्यात आली होती.

३७ क्विंटल वजनाची प्रचंड मोठी घंटा मंदिरात लटकवायची कशी असा प्रश्न अनेकांना पडला होता. घंटा लटकवताना काही बरं वाईट घडण्याचा धोका होता. त्यामुळे कोणीच जोखीम पत्करायला तयार नव्हतं.

मंदसौरचे कलेक्टर गौतम सिंह यांनी मंदिरात घंटा लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी नाहरू खान नावाच्या व्यक्तीला बोलावलं. नाहरू खान यांनी घंटा लटकवण्यासाठी १० दिवसांचा अवधी मागितला.

नाहरू खान यांना शक्कल लढवत १० दिवसांत घंटा व्यवस्थित लटकवली. घंटा लटकवल्यानंतर ती पहिल्यांदा वाजवणाऱ्यांमध्ये नाहरू खान यांच्यासह स्थानिक आमदार यशपाल सिंह, कलेक्टर गौतम सिंह आणि घंटा समितीचे दिनेश नागर यांचा समावेश आहे.

मंदसौरमध्ये जेव्हा जेव्हा एखादं मोठं काम थांबतं, त्यावेळी केवळ दुसरीपर्यंत शिकलेल्या नाहरू खान यांना मदतीसाठी बोलावलं जातं आणि नाहरू प्रत्येकवेळी मदत करतात. कलेक्टर आणि आमदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल नाहरू यांनी त्यांचे आभार मानले.

नाहरू भाई जे काम करतील, ते चांगलंच करतील, असा विश्वास मंदसौरमधील लोकांना आहे. त्याच विश्वासानं माझ्याकडे घंटा बांधण्याचं काम सोपवण्यात आलं. माझं शिक्षण दुसरीपर्यंत आहे. पण मला प्रत्यक्ष कामाचा अनुभव बराच आहे, असं खान म्हणाले.

३७ क्विंटलची घंटा बांधायची कशी असा प्रश्न अनेक इंजिनीयरना पडला. घंटा बांधताना आक्रित घडण्याची शक्यता होती. तशी भीती काहींनी बोलून दाखवली. त्यामुळेच दोन वर्षांपासून घंटा मंदिर परिसरातच होती. नाहरू यांनी अवघ्या १० दिवसांत घंटा बांधून दाखवली.