UP: कोरोना काळात कौटुंबिक घडी विस्कटली, पती-पत्नीमधील कलह पाचपट वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:34 PM2021-05-26T16:34:15+5:302021-05-26T16:40:35+5:30

domestic violence : घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत उत्तर प्रदेशातील लखनऊ पहिल्या क्रमांकावर आहे तर वाराणसी पाचव्या क्रमांकावर आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने आपले आरोग्य आणि आनंदच आपल्यापासूनच काढून घेतला नाही तर शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या बरेच नुकसान केले आहे. हेच कारण आहे की, कोरोना कालावधीत उत्तर प्रदेशातील घरगुती हिंसाचारात पाच पट वाढ झाली आहे.

शारीरिक, शाब्दिक, भावनिक आणि आर्थिक असे अनेक प्रकारचे घरगुती हिंसाचार आहेत. घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत उत्तर प्रदेशातील लखनऊ पहिल्या क्रमांकावर आहे तर वाराणसी पाचव्या क्रमांकावर आहे.

बीएचयू आयआयटीमधील कंसलटेंट सायकोलॉजी एँड सायकोथेरेपिस्ट डॉक्टर लक्ष्मण यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमध्ये याचा शारीरिक आणि मानसिक किती परिणाम होईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. आपल्या देशातील शारीरिक समस्यांविषयी बोलले जाते, परंतु मानसिक आरोग्यावर नाही. अनेकदा लोक मानसिक आजारांकरिता जादूटोणा करतात, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडते.

डॉक्टर लक्ष्मण म्हणतात की, ही मानसिक समस्या डिप्रेशन, चिंता, ओसीडी, झोपेच्या समस्या आणि पॅनिक अॅटकच्या रूपात दिसून येते. कोरोना कालावधीत लोकांमध्ये डिप्रेशन 40 टक्के, चिंता 30 ते 35 आणि ओसीडी 20 ते 25% वाढली आहे.

याशिवाय, यूपीमध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये पाच पट वाढ झाली आहे. घरगुती हिंसाचार सोडविण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे, जी उत्तर प्रदेशातील बहुतेक शहरांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे.

डॉक्टर लक्ष्मण म्हणतात की, या सर्व हिंसाचाराचा आपल्या मनावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो. लॉकडाऊन दरम्यान, बर्‍याच लोकांनी आपले घरचे गमावले, बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आणि बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला. बर्‍याच लोकांना कोरोनाची लागण झाली. अशा परिस्थितीत लोक घाबरतात आणि घरगुती हिंसाचार वाढतो.

डॉक्टर लक्ष्मण यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमधून सुमारे 1000 लोकांची माहिती गोळा करण्यात आली आणि यामध्ये कोरोना काळात घरगुती हिंसाचारामुळे कोणत्या शहरांना सर्वाधिक परिणाम झाला, हे दिसून आले. घरगुती हिंसाचारप्रकरणी लखनऊमध्ये 120 गुन्हे दाखल झाले.

यानंतर कानपूरमधून 104-105 प्रकरणे समोर आली. मेरठ तिसऱ्या क्रमांकावर होता, याठिकाणी 87 गुन्हे नोंदवले गेले. बरेलीमध्ये 80, आग्र्यामध्ये 73-75 आणि बनारसमध्ये 60-65 प्रकरणे आहेत. याशिवाय, गोरखपुरात 50 ते 55, प्रयागराजमध्ये 40 तर मुरादाबादमध्ये घरगुती हिंसाचाराची 30 ते 35 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

दरम्यान, ही शहरातील स्थिती आहे. मात्र गावातील लोकांना मानसिक आरोग्याबद्दल काहीच माहिती नाही. कोरोनासाठी ज्या प्रमाणे सर्व आरोग्य केंद्रे स्थापन केली गेली आहेत त्याचप्रमाणे मानसिक आजारांशी लढण्यासाठी मानसिक आरोग्य केंद्रेही तयार केली गेली पाहिजेत.