CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोना टेस्टला चकवा देऊ शकतो नवा सब व्हेरिएंट; प्रशासनाची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 03:11 PM2022-07-08T15:11:47+5:302022-07-08T17:27:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या नवीन सब व्हेरिएंटने आता पुन्हा एकदा देशातील शास्त्रज्ञांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

शुक्रवारी (8 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 18,815 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला असून 5,25,343 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसच्या नवीन सब व्हेरिएंटने आता पुन्हा एकदा देशातील शास्त्रज्ञांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाचा हा नवीन सब व्हेरिएंट सध्याच्या तपास पद्धतींना चकवा देऊ शकतो.

सध्या आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजेन किटद्वारे चाचणी केली जात आहे. नवी दिल्लीस्थित IGIB च्या संशोधकांचा असा विश्वास आहे की कोरोनाचे सर्व प्रकार समोर आल्यानंतर चाचणी पद्धतींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. लॅबमध्ये कोरोना चाचणी किटसह फ्रिक्वेन्सी तपासल्यानंतर ही माहिती प्राप्त झाली आहे.

अमर उजालामधील एका बातमीनुसार, सरकारी तज्ञांच्या समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला राज्यांसोबतच्या बैठकीत फक्त आरटी-पीसीआर चाचणीवर अधिक भर देण्यात यावा असं सांगण्याची शिफारस केली आहे.

देशातील बहुतांश राज्ये सध्या रॅपिड अँटीजन किट वापरत आहेत. तर कोरोना BA.4, BA.5 आणि BA.2.75 चे नवीन सब व्हेरिएंट कोरोना चाचणीच्या पॅरामीटर्सवर परिणाम करू शकतात.

IGIB वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विनोद स्करिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे की सब व्हेरिएंट ba.2.75 मधील म्युटेशन कोरोना व्हायरस शोधण्याच्या पॅरामीटर्सवर परिणाम करू शकते.

इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार, काही राज्यांमध्ये असे दिसून आले आहे की रॅपिड अँटीजेनच्या वापरामुळे तेथे संक्रमणाचे स्त्रोत गायब झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे की भारतातील काही राज्यांमध्ये BA.2.75 नावाचा ओमायक्रॉनचा नवीन सब व्हेरिएंट आढळून आला आहे. ही माहिती देताना डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस एडनोम घेब्रेयसस म्हणाले की, युरोप-अमेरिकेत BA.4 आणि BA.5 ची प्रकरणे आढळून आली आहेत.

भारतासारख्या देशांमध्ये BA.2.75 च्या नवीन सब व्हेरिएंटचा धोका वाढला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की हा प्रकार प्रथम भारतात दिसला, त्यानंतर तो इतर 10 देशांमध्ये आढळला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.