लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडून क्रॅक केली UPSC, बनली IPS, कोण आहे ही महिला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:48 IST2025-02-27T18:44:29+5:302025-02-27T18:48:22+5:30

IPS Anjali Vishwakarma: खडतर मेहनत घेत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च पदावर पोहोचणाऱ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या कहाण्या खूप प्रेरणादायी असतात. यापैकी काही जण तर आधीची लाखोंचं पॅकेस असलेली नोकरी सोडून मेहनत करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात. अशाच एका महिला अधिकाऱ्याची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खडतर मेहनत घेत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च पदावर पोहोचणाऱ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या कहाण्या खूप प्रेरणादायी असतात. यापैकी काही जण तर आधीची लाखोंचं पॅकेस असलेली नोकरी सोडून मेहनत करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात. अशाच एका महिला अधिकाऱ्याची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या महिला अधिकाऱ्याने लाखो रुपये असलेला पगार सोडून देशसेवेसाठी सरकारी नोकरी करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे आयपीएस अंजली विश्वकर्मा. अंजली विश्वकर्मा ह्या उत्तर प्रदेश पोलीस खात्यामध्ये सेवेत आहेत. तसेच आपल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. २०२१ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या अंजली विश्वकर्मा ह्या इंटरमीडिएटमध्ये उत्तर प्रदेशमधून टॉपर राहिल्या होत्या.

अंजली विश्वकर्मा या त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सांगतात की, बालपणी मी डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहत होते. माझ्या आई-वडिलांचीही तीच इच्छा असल्याने मला डॉक्टर बनावं, असं वाटायचं. मात्र बदलत्या काळानुसार माझं मन बदललं आणि मी इंजिनियरिंग केलं. मी जेईई परीक्षा क्लीयर केली आणि पुढे आयआयटी कानपूरमध्ये माझी निवड झाली.

२०१५ साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. परदेशात काम करण्यासह मला अनेक ठिकाणी फिरता आलं. मला पगारही भरपूर होता. यादरम्यान, केवळ पैसाच सर्व काही असतो का असा प्रश्न मला पडू लागला.

यादरम्यान मी एका मित्रासोबत बोलले तेव्हा त्याने तो नोकरी सोडून यूपीएससीची तयार करत असल्याचे सांगितले. तेव्हा मलाही वाटलं की, मी सुद्धा या माध्यमातून लोकांची मदत करू शकते. त्यानंतर मी यूपीएससीची तयारी सुरू केली आणि दुसऱ्याच प्रयत्नात मला यश मिळाले.

आपल्याला मिळालेल्या यशाबाबत आनंद व्यक्त करताना अंजली विश्वकर्मा यांनी सांगितले की, नोकरी सोडण्याचा माझा निर्णय चुकीचा नव्हता. सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. ती पुढे सांगते की, बारावीनंतर माझी भेट उदित पुष्करशी झाली होती. आम्ही दोघांनीही एकत्रच पुढील शिक्षण घेतलं. उल्लेखनीय बाब म्हणजे आम्ही दोघेही पुढे आयपीएस अधिकारी बनलो.

अंजली विश्वकर्मा सांगतात की, आम्ही दोघांनीही आपापल्या घरी लग्नाबाबत कल्पना दिली. तेव्हा सर्वांनीच होकार दिला. मग २०२४ मध्ये आम्ही विवाह केला. यावेळी अंजली विश्वकर्मा यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही खास सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही या परीक्षेची तयारी सुरू कराल, तेव्हा स्वत:ला मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर ठेवा. तसेच वाचल्यानंतर लिहिण्याची सवय लावून घ्या, असेही त्यांनी सांगितले.