लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:28 PM 2024-01-03T18:28:23+5:30 2024-01-03T18:50:39+5:30
उणे 55 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल येथे कार्यरत आहे. भारतातील लडाखमध्ये जगातील सर्वात उंच एअरफील्ड आहे. भारतीय लष्कर त्याला DBO (दौलत बेग ओल्डी) म्हणतात. या एअरफील्डची उंची 16,700 फूट, म्हणजे 5100 मीटर आहे. काराकोरम पर्वतरांगा आणि उत्तर लडाखच्या टेकड्यांमधील तारिम बेसिनमध्ये बांधलेले हे हवाई क्षेत्र भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. येथून भारतीय लष्कर पाकिस्तान आणि चीनवर बारीक नजर ठेवते.
1960 मध्ये भारतीय लष्कराने येथे आपली चौकी उभारली होती. यानंतर अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंड (ALG) बांधण्यात आले. विशेष म्हणजे, डीबीओ आता रस्त्यालाही जोडण्यात आले आहे. 235 किलोमीटर लांबीचा हा रस्ता दरबुक-श्योक-डीबीओ रोड म्हणून ओळखला जातो. 2019 मध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने याचे बांधकाम केले आहे.
दौलत बेग ओल्डीपासून LAC अवघ्या 8 किलोमीटर, तर चीनच्या नियंत्रणाखालील अक्साई चिन फक्त 9 किलोमीटर अंतरावर आहे. येथील तापमान उणे 55 अंश सेल्सिअसपर्यंत जाते, हवामान कधीही बदलते. या भागात खूप थंड वारे वाहतात. डीबीओच्या आजूबाजूला कोणतेही जंगल किंवा झाडे नाहीत. या भागात फोन नेटवर्कदेखील नाही.
भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल येथे कार्यरत आहेत. भारत-चीन युद्धादरम्यान 1962 मध्ये स्क्वाड्रन लीडर सीकेएस राजे यांनी या एअरफील्डवर पहिले लँडिंग केले होते. यानंतर 2008 मध्ये भारतीय हवाई दलाच्या An-32 कार्गो विमानाचे लँडिंग करण्यात आले. मधल्या काळात झालेल्या भूकंपामुळे या एअरफील्डची जमीन कमकुवत झाली होती. नंतर ती दुरुस्त करण्यात आली. यानंतर C-130J सुपर हरक्यूलिस विमान येथे उतरवण्यात आले.
2001 मध्ये भारत सरकारने लेह ते डीबीओ, असा रस्ता तयार करण्याची योजना आखली. हा रस्ता 2019 मध्ये पूर्ण झाला. 235 किलोमीटर लांबीचा हा रस्ता दरबुक-श्योक-डीबीओ रोड म्हणून ओळखला जातो. 13 हजार फूट ते 16 हजार फूट उंचीवर हा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यात श्योक नदीचे खोरे, मुर्गो, बुर्त्सा नाला आणि डेपसांगची मैदाने येतात.