अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया पराभूत, तर आपचे हे बडे नेते पराभवाच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:34 IST2025-02-08T13:23:34+5:302025-02-08T13:34:29+5:30

Delhi Election 2025 Results Live Update: आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार दिल्लीतील ७० जागांपैकी ४८ जागांवर भाजपानं आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पक्ष केवळ २२ जागांवर आघाडीवर आहे. दरम्य्यान, या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे पराभूत झाले असून, आम आदमी पक्षाचे अनेक बडे नेते पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत.

आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार दिल्लीतील ७० जागांपैकी ४८ जागांवर भाजपानं आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पक्ष केवळ २२ जागांवर आघाडीवर आहे. दरम्य्यान, या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे पराभूत झाले असून, आम आदमी पक्षाचे अनेक बडे नेते पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी आपच्या बड्या नेत्यांना अटीतटीच्या लढतींमध्ये पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामध्ये जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आपच्या मनिष सिसोदिया यांना भाजपाच्या तरविंदर सिंह मारवाह यांनी सुमारे ६०० मतांनी पराभूत केले. तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना परवेश वर्मा यांनी सुमारे ३ हजार मतांनी पराभूत केले.

अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला असतानाच आपचे इतरही काही बडे नेते पराभवाच्या छायेत आहेत. त्यामध्ये मालवीयनगर मतदारसंघात आपचे नेते सोमनाथ भारती हे ११ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर ६ हजार ५३९ मतांनी पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात भाजपाच्या सतीष उपाध्याय यांनी आघाडी घेतली आहे.

मोठा गाजावाजा करून आम आदमी पक्षात दाखल झालेले अवध ओझा पटपटगंज मतदारसंघातून पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात भाजपाच्या रविंदर सिंह नेगी यांनी २३ हजार २८० मतांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

आपच्या बड्या नेत्यांपैकी एक असलेले सत्येंद्र जैन हेसुद्धा दारुण पराभवाच्या छायेत आहेत. शकूर बस्ती मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या सत्येंद्र जैन यांच्यावर भाजपाच्या करनेल सिंह यांनी १९ हजार ३३६ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.

आपचे तरुण नेते सौरभ भारद्वाज हेही ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीमध्ये फसले आहेत. १४ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर सौरभ भारद्वाज हे ३१३९ मतांनी पिछाडीवर पडलेल आहेत. येथे भाजपाच्या शिखा रॉय यांनी आघाडी घेतली आहे.

याबरोबरच मुस्तफाबाद मतदारसंघातही आम आदमी पक्षासाठी धक्कादायक निकाल लागला आहे. येथे आम आदमी पक्षाचे अदील अहमद खान हे भाजपाच्या मोहन सिंह बिस्ट यांच्याविरोधात २७ हजार ३८७ मतांनी पिछाडीवर पडले आहेत.