Delhi Violence: दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित कट?; 'या' भागातून आणला होता दगडांचा स्टॉक! By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:39 PM 2020-02-25T15:39:57+5:30 2020-02-25T15:44:19+5:30
दिल्लीच्या मौजपूर, जाफराबाद परिसरात सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली, यावेळी दगडफेक, जाळपोळ यासारख्या हिंसक घटना घडल्या. दिल्लीत सीएए समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या तणावात मौजपूर मेट्रो स्टेशनच्या जवळपास ८ किमी परिसरातून दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरु असताना अनेक जण जखमी झाले. मौजपूर, जाफराबाद, घोंडा, कर्दमपुरी, भजनपुरा, वजीराबाद रोडसह अनेक भागात हिंसाचार नियंत्रणात आणण्यात पोलीस अपयशी ठरले.
या संपूर्ण घटनेनंतर या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात दगड आले कुठून? असा प्रश्न उभा राहिलाय, काही स्थानिकांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील सीमावर्ती भागातून ट्रकांमध्ये दगड भरुन आणले होते. काही तासानंतर दगडफेकीचा प्रकार बंद झाला.
सीएए विरोधक आणि समर्थक एकमेकांना भिडल्यानंतर सुरक्षा दलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दगडफेकीला सुरुवात झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांना जाण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यात अनेक पोलीस जखमी झाले. मात्र ही दगडफेक काही मिनिटांच्या अंतराने सुरु होत होती. हळूहळू त्याची तीव्रता वाढली.
चांद बाग, दयालपूर याठिकाणी दगडफेक झाली. संपूर्ण दिवसभर सुरु असणाऱ्या दगडफेकीत अनेक लोकं जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोरांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधक आणि समर्थक यांची संख्या वाढल्याने पोलीस दल प्रभावीपणे काम करु शकले नाही.
परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या दगडफेकीवरुन हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण यासाठी दगडांचा स्टॉक आधीच आणला होता त्याची चौकशी पोलीस करणार आहेत.
'दिल्लीत उसळलेला हिंसाचार थांबावा असेच सर्वांना वाटते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यासंदर्भात आज बोलावलेली बैठकही सकारात्मक झाली आहे. हा दिल्लीचा प्रश्न आहे आणि सर्वपक्षीय मिळून त्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.
या आंदोलनात दगडफेक करण्यात आली. तसेच दिल्लीतील गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
सोमवारी तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाले होते. भजनपुरा, मौजपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा यामध्ये मृत्यू झाला. तर डीसीपी अमित शर्मा हे जखमी झालेत.
गोकुलपुरी भागात आंदोलनादरम्यान गोळीबार करण्यात आला. पेट्रोल पंप आणि काही गाड्या पेटवण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणासाठी अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. पोलिसांची संख्या अपूर्ण असल्याने निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे.