COVID-19 4th Wave: कोरोनाची चौथी लाट येतेय! देशातील ७ राज्यांमध्ये पसरला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, 'ही' आहेत लक्षणं... By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 03:14 PM 2022-03-25T15:14:49+5:30 2022-03-25T15:20:57+5:30
COVID-19 4th wave: कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटनं गेल्या काही दिवसांपासून जगभर हाहा:कार माजवला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या एकत्रिकरणातून समोर आलेला डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिअंट समोर आला आहे. जो आता भारतातही हातपाय पसरू लागला आहे. जगात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असतानाच कोविड-19 च्या नव्या व्हेरिअंटनं नाकी नऊ आणले आहेत. तिसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनाचा प्रभाव आता संपुष्टात आला असं मानलं जात होतं आणि निर्बंध देखील शिथिल करण्यात येत आहेत. पण आता नवं संकट समोर उभं राहतं की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाचा एक नवा व्हेरिअंट समोर आला आहे आणि या व्हेरिअंटमुळे जगभरात चौथी लाट निर्माण होऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) देखील या व्हेरिअंटबाबत माहिती दिली आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्हींच्या झपाट्यानं झालेल्या प्रसारामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असं WHOनं म्हटलं आहे.
कोविड-19 च्या या नव्या व्हेरिअंटचं नाव डेल्टाक्रॉन आहे, जो ओमिक्रॉन आणि डेल्टा विषाणूच्या एकत्रिकरणातून तयार झाला आहे. अहवालानुसार, भारतात या व्हेरिअंटची ओळख पटली असून 7 राज्यांमध्ये आढळलेल्या रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. या राज्यांमध्ये कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्ली यांचा समावेश आहे.
अशा परिस्थितीत, हे नवीन प्रकार डेल्टाक्रॉन किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. डेल्टाक्रॉन हा एक रीकॉम्बिनंट व्हेरिअंट आहे, जो ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिअंटचं संयोजन आहे. डेल्टाक्रॉनची ओळख फेब्रुवारी 2022 मध्ये झाली.
वास्तविक पाहता पॅरिसमधील इन्स्टिट्यूट पाश्चर (Institut Pasteur) येथील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिअंट शोधला होता, जो पूर्वीच्या व्हेरिअंटपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. डेल्टाक्रॉनचं सॅम्पल उत्तर फ्रान्समधील एका वृद्ध व्यक्तीकडून समोर आलं होतं. सॅम्पलच्या तपासणीनंतर, व्हेरिअंट अगदी वेगळा दिसत होता.
नव्या व्हेरिअंटच्या चाचणीत असं आढळून आलं की त्याचे बहुतांश जेनेटिक्स डेल्टा प्रकारासारखेच होते, जो गेल्या वर्षाच्या अखेरीस जगभरात सर्वात प्रभावी व्हेरिअंट ठरला होता. परंतु या व्हेरिअंटचा भाग जो विषाणूच्या स्पाइक प्रोटीनला एन्कोड करतो आणि ज्याचा उपयोग तो पेशींच्या आत जाण्यासाठी वापरतो तो ओमायक्रॉनमधून आला आहे.
Institut Pasteur च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार युके आणि यूएसमध्या आढळून आलेले डेल्टाक्रॉन व्हेरिअंटमध्ये काही फरक दिसून आला आहे. त्यामुळे या व्हेरिअंटचे अनेक प्रकार पाहायला मिळू शकतात.
नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉन आणि डेल्टा यांच्या मिश्रणातून बनलेल्या या विषाणूची लक्षणे पूर्वीच्या साथीच्या रोगासारखीच आहेत. परंतु शास्त्रज्ञ अजूनही त्याचे परिक्षण करत आहेत आणि त्याच्या इतर लक्षणांबद्दल शोध घेत आहेत. डेल्टा हा कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक प्रकार मानला जातो आणि डेल्टा आणि ओमिक्रॉन यांना जोडून डेल्टाक्रॉन तयार होतो. जर एखाद्याला याची लागण झाली असेल, तर संक्रमित व्यक्तीला काही सौम्य आणि काही गंभीर लक्षणे जाणवू शकतात.
लक्षणं कोणती? डोकेदुखी, खूप ताप, घाम येणे, थंडी वाजून ताप येणे, घसा खवखवणे, सतत खोकला, थकवा, ऊर्जा कमी होणे, अंगदुखी ही ओमायक्रॉनच्या BA.2 प्रकाराची लक्षणे आहेत. Omicron BA.2 ची इतर लक्षणे म्हणजे ताप, खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा आणि हृदयाची गती वाढणे.
डेल्टाक्रॉनबाबत केलेल्या अभ्यासानुसार, या प्रकाराची दोन प्रमुख लक्षणे म्हणजे चक्कर येणे आणि थकवा येणे, जे संसर्ग झाल्यानंतर 2-3 दिवसांत जाणवू लागतात. काही अहवाल असं सुचवतात की डेल्टाक्रॉनचा नाकापेक्षा पोटावर जास्त परिणाम होत आहे. पोटावर त्याचा परिणाम झाल्यामुळे, रुग्णाला मळमळ, जुलाब, उलट्या, ओटीपोटात दुखणे, जळजळ, सूज येणे आणि पचन समस्या येऊ शकतात.
IHU मेडिटेरेनियन इन्फेक्शन (फ्रान्स) तज्ञ फिलिप कोल्सन यांच्या मते, जगात या व्हेरिअंटची पुष्टी झालेली फारच कमी प्रकरणं आहेत, डेल्टाक्रॉन अधिक सांसर्गिक असेल किंवा गंभीर आजार होईल हे सांगणे कठीण आहे. याशिवाय, पुरेसा डेटा देखील सध्या उपलब्ध नाही, ज्याच्या आधारे याबद्दल माहिती देता येईल.