फेक कॉल्सवर सरकारने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिला महत्त्वाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 19:06 IST2025-02-19T19:00:58+5:302025-02-19T19:06:01+5:30

दूरसंचार विभागाने मेटा आणि एक्स सारख्या कंपन्यांना लोकांना फोन कॉलची ओळख कशी बदलायची हे शिकवणाऱ्या पोस्ट किंवा ॲप्लिकेशन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

सायबर फसवणूक आणि फेक कॉल्सला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सल्ला दिला आहे.

दूरसंचार विभागाने सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेनुसार गुगल, मेटा, इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना असा कंटेट किंवा अ‍ॅप्लिकेशन काढून टाकावे लागणार आहेत.

सरकारने सोशल मीडया प्लॅटफॉर्मना युजर्सच्या कॉलर आयडीमध्ये फेरफार करण्यास सक्षम असणारा कंटेट किंवा अ‍ॅप्लिकेशन काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या नवीन सल्ल्यानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला २८ फेब्रुवारीपर्यंत या नियमांचे पालन करावे लागणार आहे

दूरसंचार विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ऍप्लिकेशन होस्टिंग सर्व्हिसेसना कॉलिंग लाइन आयडेंटिफिकेशन किंवा कॉलर आयडी स्पूफिंगची सुविधा देणारा कंटेट त्वरित काढून टाकायला सांगितला आहे. फोन नंबर लपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्या लोकांविरोधात दूरसंचार विभागाने हे पाऊल उचललं आहे.

फोन कॉलरची खरी ओळख लपवणे बेकायदेशीर आहे. दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत यावर बंदी आहे. कोणत्याही व्यक्तीला खोट्या कागदपत्रांद्वारे सिम कार्ड किंवा अन्य टेलिकॉम आयडी मिळवण्याची परवानगी नाही.

दूरसंचार कायद्याचे उल्लंघन केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. जर कोणतेही ॲप किंवा वेबसाइट कॉलिंग लाइन आयडेंटिफिकेशन स्पूफिंगला प्रोत्साहन देत असेल तर ते देखील बंद केले जाईल,असा इशारा दूरसंचार विभागाने दिला आहे.

कॉलर आयडी स्पूफिंग हे एक फसवणूक तंत्र आहे ज्यामध्ये कॉलर आपण इतर कोणीतरी आहेत हे दाखवण्यासाठी त्याचा फोन नंबर बदलतो. ही फसवणूक करण्यासाठी अनेक ॲप्स स्कॅमर वापरतात आणि लोकांना त्यांचे वैयक्तिक आणि आर्थिक तपशील शेअर करण्यास भाग पाडतात.