प्रक्षेपण, तीन टप्पे सुरळीत पार, तांत्रिक बिघाड अन् दोन्ही उपग्रह थेट चुकीच्या कक्षेत, नेमकं काय घडलं, पाहा! By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 11:05 AM 2022-08-08T11:05:04+5:30 2022-08-08T11:10:02+5:30
एसएसएलव्ही अग्निबाणाबरोबर अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलेल्या दोन उपग्रहांपैकी इओएस-०२ हा मायक्रो सॅटेलाइट उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ३५० कि.मी. उंचीपर्यंत प्रक्षेपित केला जाणार होता. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अवकाशामध्ये लघुउपग्रह प्रक्षेपण वाहन (स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल - एसएसएलव्ही) प्रक्षेपित करीत इतिहास घडविण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रयत्नांना रविवारी अपयश आले. येथील प्रक्षेपण स्थळावरून अवकाशात सोडण्यात आलेल्या एसएसएलव्हीचे नियोजनानुसार अवकाशात जाऊन विलगीकरणापर्यंतचे तीन टप्पे सुरळीत पार पडले असले तरी टर्मिनल टप्प्यावर तांत्रिक बिघाड निर्माण होऊन उपग्रहांचे नुकसान झाले (डेटा लॉस). त्यामुळे एसएसएलव्हीसोबत सोडलेले दोन उपग्रह चुकीच्या कक्षेत स्थिरावल्यामुळे ते आता निकामी झाले आहेत.
इओएस-०२ टिपणार होता पृथ्वीची छायाचित्रे एसएसएलव्ही अग्निबाणाबरोबर अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलेल्या दोन उपग्रहांपैकी इओएस-०२ हा मायक्रो सॅटेलाइट उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ३५० कि.मी. उंचीपर्यंत प्रक्षेपित केला जाणार होता. तो पृथ्वीच्या पृष्ठभागाची छायाचित्रे टिपणार होता. रात्रीच्या वेळी चांगले फाेटाे टिपण्याची या उपग्रहाची क्षमता हाेती.
एसएसएलव्हीचा प्रथमच वापर छोट्या आकाराच्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी एसएसएलव्ही अग्निबाण प्रथमच वापरण्यात आला. याआधी या कामासाठी पीएसएलव्ही अग्निबाणावर अवलंबून राहावे लागायचे. पीएसएलव्हीला लाँच पॅडपर्यंत आणण्यासाठी तसेच त्याची जुळणी करण्याकरिता दोन ते तीन महिने खर्ची पडायचे. मात्र एसएसएलव्हीच्या भागांची अग्निबाण जुळणी २४ ते ७२ तासांत करता येते. त्यामुळे पैसे व वेळ यांची मोठी बचत होते.
एसएसएलव्हीवर लक्ष केंद्रित पीएसएलव्ही, जीएसएलव्ही या अग्निबाणांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर एसएसएलव्हीच्या प्रक्षेपणावर इस्रोने लक्ष केंद्रित केले होते. ५०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ५०० कि.मी. उंचीपर्यंत प्रक्षेपित करण्याची एसएसएलव्ही अग्निबाणाची क्षमता आहे.
विद्यार्थ्यांनी बनविला होता आझादीसॅट ग्रामीण भागातील सरकारी शाळांतील ७५० विद्यार्थ्यांनी बनविलेला व आठ किलो वजनाचा आझादीसॅट नावाचा उपग्रहदेखील एसएसएलव्हीबरोबर प्रक्षेपित केला. या उपग्रहात विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ५० ग्रॅम वजन असलेल्या ७५ वस्तू ठेवल्या होत्या. आझादीसॅट उपग्रहाचे डिझाईन बनविणाऱ्या विद्यार्थिनीही त्याचे प्रक्षेपण बघण्यासाठी इस्रोच्या अवकाश केंद्रात उपस्थित होत्या. मात्र हा उपग्रह आता निकामी झाल्यामुळे विद्यार्थी निराश झाले.
छोट्या उपग्रहांसाठी होती मोठी मोहीम एसएसएलव्हीचे रविवारी झालेले प्रक्षेपण यशस्वी ठरले असते तर इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असता. इतर देशांचे छोट्या आकारांचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची अनेक कामे भारताला यशस्वीरीत्या पार पाडता आली असती.