- मयूर पठाडे घरगुती गॅसगळतीमुळे विशेषत: सिलिंडरच्या गळतीमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे होणार्या मृत्यूंची संख्या आपल्याकडे खूपच अधिक आहे. अगदी खेड्यापाड्यातही आज स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर्स वापरले जातात, पण त्यासंदर्भात म्हणावी तितकी काळजी घेतली जात नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या अभ्यासानुसार गॅस सिलिंडर्समुळे होणार्या मृत्यूंचं प्रमाण दुसर्या क्रमांकावर आहे. या अपघातांत अर्थातच बळी जाण्याचं प्रमाण महिलांचं आहे आणि त्यात तब्बल 82 टक्के वाटा महिलांचा आहे.घरातलं किचन हा सर्वाधिक महत्त्वाच भाग, मात्र त्याकडे सर्वात कमी लक्ष दिलं जातं ही वस्तुस्थिती आहे. मुख्यत: गॅस गळती आणि सिलिंडर्सच्या बाबतीत जर थोडीशी काळजी घेतली तर हे प्रमाण बर्याच प्रमाणात कमी होऊ शकेल.गॅस गळतीचे विविध प्रकार आहेत. भोपाळ गॅस गळतीची दुर्घटना तर देशातच नव्हे, जगात प्रसिद्ध आहे. अनेकदा कंपन्यांमध्ये, रस्त्यावरचे टॅँकर्स आणि अगदी गटारात उतरलेल्या कामगारांचाही विषारी वायूमुळे मृत्यू झाल्याच्या घटना नेहमी ऐकायला मिळतात. कालच दिल्लीतील तुघलकाबाद येथील एका सरकारी शाळेतील तब्बल 350 मुलांना गॅसगळतीमुळे दवाखान्यात भरती करावं लागलं.गॅस गळतीचे असे अनेक प्रकार असले तरी मुख्यत: स्वयंपाकघरात असलेल्या सिलिंडर्सच्या गळतीमुळे होणारे अपघात देशात सर्वाधिक आहेत. थोडीशी नियमित दक्षता घेतली तर या अपघातांपासून सहज वाचता येऊ शकतं. कशी घ्याल काळजी? 1- आपले गॅस सिलिंडर आणि गॅसची नळी यांची नियमित तपासणी करीत चला.2- आपण ज्या कंपनीकडून गॅसचे सिलिंडर घेतो, त्यांची माणसंही नियमितपणे चौकशीसाठी येत असतात. त्यांच्याकडून वेळोवेळी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. कंपनीची माणसं जर तपासणीसाठी येत नसतील तर आपणच त्यांना बोलावून घेतलं पाहिजे.3- तपासणीसाठी पैसे पडतील किंवा नळी चांगली असतानाही नवी घ्यायची काय गरज, कंपनीचा माणूस पैसे उकळण्यासाठी आपल्याला नवी नळी घेण्यास सांगतो आहे असे न समजता योग्य वेळी योग्य ती खबरदारी घेणे आणि वेळच्यावेळी साहित्य बदलणे गरजेचे आहे. 4- गॅस सिलिंडरची नळी चांगल्या दर्जाचीच असली पाहिजे. बाजारात कमी किंमतीत, पण कमी दर्जाच्या नळ्या मिळतात, त्यांच्या मोहात पडू नये.5- सिलिंडर संपल्यानंतर कंपनीकडून जेव्हा नवीन सिलिंडर आपल्याकडे येतो, त्यावेळीही कंपनीच्या माणसाकडून तो लिक वगैरे नाही ना, याची व्यवस्थित खात्री करुन घ्या.6- स्वयंपाकाचे काम झाल्यानंतर रॅग्युलेटरचा स्विच नियमितपणे बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक अपघात टळू शकतात.7- घरात लहान मुलं असतील तर बर्याचदा त्यांच्याकडून शेगडीचा स्विच सुरू राहून दुर्घटना घडू शकते. रेग्युलेटरचा स्विच बंद असेल तर अशा दुर्घटना टळू शकतात. झालीच गॅसगळती, तर काय कराल? 1- घरात गॅसचा वास येतो आहे अशी शक्यता जरी वाटली, तरी लगेच अगोदर दारं खिडक्या उघडून हा वास बाहेर जाऊ द्या.2- तोपर्यंत, अगदी रात्र असली तरीही ट्यूब किंवा लाईटचे बटनही सुरू करू नका. त्यातून निघणारी ठिणगीही आग लागायला कारणीभूत ठरू शकते. 3- गॅसचा वास येत असल्यास काडेपेटी, गॅस लायटर, सिगारेट लायटर किंवा तत्सम कोणत्याही गोष्टी वापरू नका.4- घरात दुसर्या खोलीत कुठे मेणबत्ती वगैरे सुरू असेल तरी ती लगेच विझवा.5- सिलिंडरच्या रेग्युलेटरचा स्विच तातडीनं बंद करा. 6- शक्य असेल तर रेग्युलेटर काढून सिलिंडरही घराबाहेर उघड्यावर नेऊन ठेवा.7- कंपनीच्या माणसाला तातडीनं फोन करुन बोलवा.8- त्यासंदर्भातले फोन नंबर्स आपल्या हाताशी आणि घरातील सर्वांना दिसेल अशा ठिकाणी ठळक अक्षरात लिहून ठेवा.9- काही शंका असेल तर नॅशनल गॅस सर्व्हिस इर्मजन्सीला फोन करा. 0800 111 999 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते. 10- काही तातडीच्या गोष्टींसाठी ते फोनवरही आपल्याला मार्गदर्शन करू शकतात.