सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 18:01 IST2024-11-08T17:55:54+5:302024-11-08T18:01:36+5:30

भारताचे सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होत आहेत. परंतु ८ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टातील त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. चंद्रचूड यांच्या निरोप समारंभाला खंडपीठ बसले होते, त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले. त्यात न्याय. मनोज मिश्रा, न्या. जेबी पारदीवाला, अनेक जेष्ठ वकील त्याशिवाय १० नोव्हेंबरपासून सरन्यायाधीशपदाची धुरा सांभाळणारे न्या. संजीव खन्नाही सहभागी होते.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांना १३ मे २०१६ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावरून सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळाली होती. त्यांच्या कार्यकाळात, CJI चंद्रचूड १२७४ खंडपीठांचा भाग होते. त्यांनी एकूण ६१२ निर्णय दिलेत. CJI चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या न्यायाधीशांमध्ये सर्वाधिक निकाल दिले आहेत. शेवटच्या दिवशीही त्यांनी ४५ खटल्यांची सुनावणी केली.
CJI चंद्रचूड यांच्या २ वर्षांच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णयांमध्ये कलम ३७०, रामजन्मभूमी मंदिर, वन रँक-वन पेन्शन, मदरसा प्रकरण, सबरीमाला मंदिर वाद, निवडणूक रोख्यांची वैधता आणि CAA-NRC सारख्या निर्णयांचा समावेश आहे.
यावेळी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल म्हणाले की, माझ्या ५२ वर्षांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकाळात मी एवढा संयम असलेला न्यायाधीश कधीच पाहिला नाही. तुम्ही देशातील अशा समुदायांपर्यंत पोहोचलात जे आम्ही यापूर्वी पाहिले नव्हते किंवा ऐकले नव्हते. तुम्ही त्यांना न्यायालयात आणले आणि न्याय म्हणजे काय ते सांगितले असं त्यांनी सांगितले.
तर सुनावणीच्या वेळी आयपॅड कसा वापरायचा हे तुम्ही आम्हाला शिकवले, निदान मी तरी ते शिकले. तुमचं तारुण्य रूप आम्हाला म्हातारे असल्यासारखे वाटतं. निदान त्याचे रहस्य तरी सांगा असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटल्यावर कोर्टात सरन्यायाधीशांपासून सगळेच हसायला लागले.
दरम्यान, चंद्रचूड यांनी माझे काम सोपे आणि कठीण दोन्ही केले आहे. सोपं यासाठी कारण त्यांनी अनेक बदल घडवले आहेत आणि कठीण यासाठी कारण मी त्यांच्याशी बरोबरी करू शकत नाही. त्यांची कमतरता नेहमी जाणवेल. त्याच्या यंग लूकची चर्चा इथेच नाही तर परदेशातही आहे. ऑस्ट्रेलियातील बरेच लोक माझ्याकडे आले आणि चंद्रचूड यांचे वय किती आहे हे विचारले असं न्यायाधीश संजीव खन्ना यांनी सांगितले.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत म्हणजेच सुमारे ७ वर्षांचा होता. वडिलांच्या निवृत्तीनंतर ३७ वर्षांनी मुलगा त्या पदावर बसला. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी त्यांच्या वडिलांचे सर्वोच्च न्यायालयातील दोन मोठे निर्णयही रद्द केले आहेत.
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात न्यायालय अधिक हायटेक झाले. यामध्ये ई-फायलिंग, पेपरलेस सबमिशन, प्रलंबित खटल्यांसाठी व्हॉट्सॲप अपडेट्स, डिजिटल स्क्रीन, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, प्रगत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, प्रलंबित प्रकरणांचा थेट मागोवा, सर्व कोर्टरूममधून लाईव्ह स्ट्रीमिंग सारख्या सुधारणा समाविष्ट आहेत.
सर्वोच्च न्यायालयात उन्हाळ्याच्या सुट्टीऐवजी आंशिक न्यायालयीन कामकाजाचा दिवस हा शब्द वापरण्यात येणार आहे. नवीन कॅलेंडरनुसार, यावर्षी हा कालावधी २६ मे २०२५ ते १४ जुलै २०२५ असा असेल. नवीन नियमांनुसार,रविवार वगळता ९५ दिवसांपेक्षा जास्त सुट्टी मिळणार नाही. यापूर्वी ही संख्या १०३ होती
ब्रिटनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने विचारले की, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या खुर्च्या सारख्या का नसतात. म्हणजेच, त्यांच्या बॅकरेस्टची उंची वेगळी का आहे? त्यानंतर जेव्हा CJI चंद्रचूड भारतात परतले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची देखभाल पाहणाऱ्या रजिस्ट्री अधिकाऱ्याला याबाबत माहिती दिली आणि त्यात बदल करण्याच्या सूचना दिल्या.