कमाईची संधी! LPG गॅस एजन्सी कशी खोलायची; कंपन्यांना गरज नव्या डीलरची... By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 10:51 PM 2023-04-26T22:51:40+5:30 2023-04-26T22:58:00+5:30
देशात गॅसचे दर जसे वाढलेत तसे त्याचे महत्वही वाढले आहे. अद्याप पुण्यासारखे शहर पाईप गॅसपासून दूर आहे. अशातच शहरीकरण वाढत आहे. मुंबई, पुण्यासारखी शहरे वाढत आहेत. यामुळे या घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरही लागणार आहेत. आजकाल तर प्रत्येक घरात दोन सिलिंडरचे कनेक्शन घेण्याचा ट्रेंड आला आहे. अशावेळी तुम्हाला एलपीजी गॅस सिलिंडर मोठी कमाई करून देणार आहे.
य़ासाठी तुम्हाला एजन्सी टाकावी लागणार आहे. केंद्र सरकारने गॅस कनेक्शन वाटण्यात कोणतीही आडकाठी केलेली नाहीय. सरकारी आणि खासगी कंपन्या गॅस कनेक्शन देत आहेत. यामुळे ही गॅस एजन्सी कशी मिळावावी, त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
गॅस एजन्सी घेण्यासाठी सरकारने काही कायदे, अटी घातल्या आहेत. जर तुम्ही त्या पूर्ण करू शकत असाल तर तुम्हाला गॅस एजन्सी दिली जाणार आहे. गॅस वितरक कंपन्या चार प्रकारच्या एलपीजी गॅस एजन्सी देतात. यामध्ये शहरी वितरक, निमशहरी वितरक, ग्रामीण वितरक आणि अवघड क्षेत्रासाठी वितरक येतात.
तुमच्या क्षेत्रानुसार गॅस एजन्सी उपलब्ध आहे. शहरी वितरकाअंतर्गत शहरी भागात गॅस एजन्सी उपलब्ध करून दिली जाते.
शहरी-ग्रामीण वितरक हा शहरी भागात तसेच जवळपासच्या गावात गॅस सुविधा पुरवतो. ग्रामीण वितरक अंतर्गत, गावात एलपीजी वितरण गॅस एजन्सी दिली जाते. त्याचबरोबर दुर्गम भागासाठी, त्या भागांसाठी एजन्सी दिली जाते. या भागात ग्रामीण आणि ग्रामीण वितरक सेवा प्रदान करण्यास अक्षम ठरतात.
पात्रता काय असावी... अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. राज्य किंवा केंद्रीय बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही तेल वितरण कंपनीत नोकरीला नसावा.
कुठे लक्ष ठेवाल... वेळोवेळी गॅस एजन्सीची अधिसूचना तेल कंपन्यांकडून वर्तमानपत्रात आणि www.lpgvitarakchayan.in/ वर दिली जाते. वेबसाइटवर गॅस एजन्सी मिळविण्यासाठी नोंदणी करावी लागेल. अर्ज केल्यानंतर पुढची प्रोसेस कशी असते...
तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाते आणि निवड झाल्यानंतर, कंपनीला तुमच्याकडून आवश्यक कागदपत्रे एजन्सीकडे जमा करावी लागतात. कागदपत्रे पडताळणी व सर्व पार पडले की एजन्सी तुम्हाला गॅस एजन्सीची मान्यता दिली जाते. सिक्युरिटी जमा केल्यानंतर तुम्हाला गॅस एजन्सी मिळते.
त्याची किंमत किती आहे कोणतीही गॅस एजन्सी घेण्यासाठी ग्रामीण भागासाठी 10 लाख रुपये आणि शहरी भागासाठी 15 लाख रुपये गुंतवावे लागतात. यामध्ये ऑफिस, स्टोअर रुम आणि मालवाहतूक करणारे वाहन असावे लागते. ग्रामीण भागात या गोष्टी खूप स्वस्तात मिळतात, तर शहरी भागात यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.