इकडे तिकडे नोटाच नोटा... मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:12 PM2022-07-22T23:12:08+5:302022-07-22T23:21:43+5:30

west bengal : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई केली आहे. येथील ममता सरकारच्या एका मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. छापेमारीनंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये खोलीत फक्त नोटाच नोटा दिसत आहेत.

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. या कारवाईत 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळ भरती घोटाळ्याशी संबंधित चौकशीच्या संदर्भात ईडीने हा छापा मारला. ईडीने पार्थ चॅटर्जी, परेश सी. अधिकारी, माणिक भट्टाचार्य, अर्पिता मुखर्जी आणि इतरांच्या घरावर आणि घरांवर छापे टाकले आहेत.

पार्थ चॅटर्जी यांच्याकडे ममता सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच संसदीय कामकाज, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा कार्यभार आहे. यापूर्वी त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कारभार होता.

अर्पिता मुखर्जी यांच्या विरोधात ईडीला काही सबळ पुरावे मिळाले, त्यानंतर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. काही तासांच्या छाप्यांमध्ये नोटांचा ढिगारा समोर आला आहे.

ईडीची टीम पार्थ चॅटर्जीच्या घरी 11 तासांपेक्षा जास्त वेळ थांबली. अर्पिता मुखर्जी यांच्या व्यतिरिक्त राज्याचे शिक्षण मंत्री माणिक भट्टाचार्य, आलोक कुमार सरकार, कल्याण मोय गांगुली यांच्या घरावर सुद्धा छापेमारी करण्यात आली. बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्यात या सर्वांचे कनेक्शन समोर आले आहे.

छाप्यात ईडीने केवळ रोखच नाही तर 20 मोबाईल फोनही जप्त केले. नोटा मोजण्यासाठी ईडीने बँक अधिकाऱ्यांची मदत घेतली. मात्र, अर्पिता मुखर्जी या फोनचे काय करत होत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

छापेमारीत ईडीने अनेक कागदपत्रे, बनावट कंपन्यांचे रेकॉर्ड, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, विदेशी चलन आणि सोनेही जप्त केले आहे. उच्च न्यायालयाने अलीकडेच शिक्षक भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले, परंतु मनी लाँड्रिंग प्रकरण समोर आल्यानंतर ईडी देखील तपास करत आहे.