Eknath Shinde, Ravi Rana Ayodhya Visit: दौरा शिंदेंच्या शिवसेनेचा, रवी राणांनीच भाव खाल्ला; अयोध्येत नेमके काय घडलेय पहा... By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 02:04 PM 2023-04-09T14:04:43+5:30 2023-04-09T14:15:25+5:30
Ravi Rana in Limelight Ayodhya Tour: राम लल्लाचे दर्शन, महाआरती, हनुमानगढी असो की राम मंदिराच्या कामाची पाहणी असो, सगळीकडे राणाच राणा... कार्यक्रमाच्या शेवटी तर... शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आमदार, मंत्र्यांसह अयोध्या दौरा केला. यामध्ये अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री झाली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिंदेंच्या शिवसेनेचा दौरा असला तरी तो भाजपा आणि रवी राणांचाच असल्याचे सर्वत्र वाटत होते. त्यात सर्वाधिक रवी राणांनी भाव खाल्ला आहे.
राम लल्लाचे दर्शन, महाआरती, हनुमानगढी असो की राम मंदिराच्या कामाची पाहणी असो, शिवसेना भाजपाचे आमदार, मंत्री मागेच होते परंतू अपक्ष आमदार रवी राणा हे एकतर फडणवीसांच्या बाजुला किंवा त्यांच्या मागेच होते. आरतीला देखील राणा बाजुलाच होते. यानंतर झालेल्या संबोधनात देखील रवी राणा स्टेजवर होते. या वेळी राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजपाचे बाहुबली खासदार बृजभूषण सिंह देखील होते.
रवी राणा यांची उपस्थिती आणि वावर लक्षणिय होता. रवी राणांनी केलेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका केली. एकनाथ शिंदेंचे भाषण झाल्यावरही तिथे खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर हनुमान चालिसा वाचल्याने कसा अन्याय झाला त्याची टेप लावली गेली होती. एवढेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणात देखील राणा, राणा आणि राणाच होते. यावरून हा कार्यक्रम शिंदेंच्या शिवसेनेचा की राणांचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राणा काय म्हणाले.... अमरावतीमध्ये १११ फुटांची हनुमानाची मूर्ती स्थापन होणार आहे. येथील राजू महाराज उपस्थित आहेत कलश यात्रा काढली जाणार आहे. जो श्रीरामांचा नाही, हनुमानाचा नाही, तो कोणत्या कामाचा नाही, असे म्हणत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
तुम्ही पाहिला असाल, राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसा बोलू दिली नाही. १४ दिवस तुरुंगात ठेवले. त्यांचा धनुष्यबाण गेला, पक्ष गेला, सत्ता गेली. अहंकारी उद्धव ठाकरेंना हनुमानाने शिक्षा दिली. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. हिंदुत्व शिंदेंकडे असल्याने शिवसेना त्यांच्याकडे आहे. धनुष्यबान त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे आहे, असे राणा आपल्या भाषणात म्हणाले. यानंतर ब्रृजभूषण सिंह यांचे भाषण झाले. त्यानंतर शिंदेंचे झाले., असे राणा म्हणाले.
शिंदे काय म्हणाले... लखनऊ ते अयोध्यात पूर्ण परिसर भगवामय झाला आहे. राममय झाला आहे. सर्व रामभक्त अयोध्येत आले आहेत. रवी राणा इथली माती घेऊन जाणार आहेत. तिथे हनुमानाची १११ फुटी मूर्ती उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझे जे स्वागत झाले त्याचे मी आभार मानत आहे. बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न होते, राम मंदिराचे निर्माण व्हावे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे सर्व खोटे ठरविले. मोदींनी त्यांच्याच काळात मंदिराचे काम सुरु केले आहे. तारीखही सांगितली आहे. जे विचारत होते त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.
हनुमान चालिसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा, रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकले होते. हे पाप करणारे रावण की राम आहेत, हे सांगा. साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा हे चुप बसलेले. आमच्या सरकारमध्ये साधू कांड होणार नाही. आम्ही त्यांचे रक्षण करणार. महाराष्ट्रात आता प्रभू रामांच्या आशिर्वादाने बनलेले सरकार काम करणार आहे, असा मी विश्वास देतो, असेही शिंदे म्हणाले.