ठाकरे कुटुंबाच्या हातून 'शिवसेना' गेली, पण पक्ष फुटीची ही काही पहिलीच वेळ नाही; 'या' घटना सांगतात इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 09:54 AM2023-02-18T09:54:51+5:302023-02-18T10:00:59+5:30

शिवसेना आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाचं यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील लढ्याचा निकाल अकेर काल निवडणूक आयोगानं दिला. आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजूनं कौल देत त्यांच्या पक्षाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केलं आहे. आयोगाच्या या ऐतिहासिक निकालानंतर तब्बल ५७ वर्षांनंतर शिवसेना पक्ष ठाकरे कुटुंबाच्या हातून गेला आहे.

निवडणूक आयोगानं याआधी एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि दोन तलवार-एक ढाल असं निवडणूक चिन्ह दिलं होतं. ते आता तात्काळ मागे घेण्यात आलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाला मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं होतं.

प्रमुख पक्षात फूट पडण्याचं हे काही पहिलंच प्रकरण नाही. याआधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बाबतीत हेच घडलं होतं. १९६९ साली पक्षाचं विभाजन होऊन दोन गट पडले होते. काँग्रेस (ओ) आणि काँग्रेस (आय) असं दोन गटांचं नाव देण्यात आलं होतं. १९७८ मध्ये काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा फूट पडली. यावेळी काँग्रेस (इंदिरा) आणि काँग्रेस (उर्स) असे गट तयार झाले होते.

१९८० साली तामीळनाडूत अन्नाद्रमूक दोन गटांत विभागला गेला होता. एका पक्षाचं नेतृत्व एमजी रामचंद्रन यांची पत्नी वीएन जानकी यांनी केलं होतं. तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व जयललिता यांनी केलं. पुढे जनता दल पक्षाचंही असंच विभाजन झालं होतं. यात जद(यू) आणि जद(एस) असे दोन गट पडले होते.

२०१२ साली उत्तराखंडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की क्रांती दलाचे दोन गट पडले होते. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं २०१७ साली निवडणुकीच्या टप्प्यावरच विभाजन झालं होतं. पुढे शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्युलर मोर्चा नावाचा पक्ष सुरू केला होता.

उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद लोकशाही तत्त्वाचे पालन करून तयार केलेले नव्हते, असे नमूद करून आयोगाने ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला. आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत पक्षाचे नाव आणि चिन्ह यांचे वाटप केल्याचे म्हटले आहे.

राज्यघटनेच्या ३२४ नुसार मिळालेल्या अधिकारानुसार व निवडणूक चिन्ह वाटप कायदा १९६८ च्या कलम १५ व १८ नुसार पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह हे अर्जदार एकनाथ शिंदे यांना देत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.