UP Election 2022: BJP चा करेक्ट कार्यक्रम! निवडणूक आयोगाच्या बंदीपूर्वीच घेतल्या ३९९ रॅली-सभा; योगींनी केले २५० दौरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 09:25 AM2022-01-10T09:25:44+5:302022-01-10T09:31:30+5:30

UP Election 2022: पंतप्रधान मोदींनी लोकार्पण, भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने उत्तर प्रदेशमधील १२ हून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला, अशी माहिती देण्यात आली आहे.

लखनऊ: देशभरातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाचही राज्यात होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून, अवघ्या देशाचे सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे (UP Election 2022) लागले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचारसभा, सर्व प्रकारच्या रॅली यांवर बंदी घातली आहे.

मात्र, भारतीय जनता पक्षाने (BJP) या बंदीपूर्वीच सुमारे ३९९ रॅली, प्रचारसभा घेतल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनीही प्रदेशातील २५० हून अधिक मतदारसंघांचा दौरा केला आहे.

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील प्रचारक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच कमीत कमीत २५० हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला आहे.

योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी १९ डिसेंबरपासून सुरू झालेल्या जनविश्वास यात्रेच्या निमित्ताने घेतलेल्या जनसभा, प्रचारसभा, रॅली, रोड शो, नुक्कड सभा यांची संख्या ३९९ च्या घरात आहे.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या दोन महिन्यात लोकार्पण कार्यक्रम, भूमिपूजन सोहळे यांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील १२ हून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला, अशी माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी २० ऑक्टोबर २०२१ रोजी कुशीनगर येथे एका आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमासह दौऱ्यांना सुरुवात केली. यानंतर सुल्तानपूर, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर, महोबा, झांसी, बलरामपूर, शाहजहांपूर, नोएडा, कानपूर आणि लखनऊ या ठिकाणी दौरे केले.

पंतप्रधान मोदींची शेवटची जनसभा २ जानेवारी रोजी मेरठला झाली. तर भाजपने ९ जानेवारी रोजी आपल्या जनविश्वास यात्रेची सांगता केली. मात्र, कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पक्षाने काही रॅली, सभा रद्द केल्या.

इतकेच नाही तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही गेल्या दोन महिन्यांपासून उत्तर प्रदेशमध्ये जनसभा घेतल्या. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

समाजावादी पक्षाने काही ठिकाणी रॅली, जनसभा घेतल्या. दरम्यान, निवडणूक आयोगाने १५ जानेवारी २०२२ पर्यंत निवडणूक होणाऱ्या पाचही राज्यांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला जाहीर सभा, सायकल किंवा बाईक रॅली, रोड शो आयोजित करता येणार नसल्याचे जाहीर केले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असेही निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले आहे. सर्व राजकीय पक्षांना यावेळी फक्त सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून प्रचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

देशातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता राजकीय पक्षांनी प्रसारासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. १५ जानेवारीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील नियम जाहीर केले जातील असंही निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.