कोरोनावरील लस रवाना झाल्यानंतर अदर पूनावाला भावूक, कर्मचाऱ्यांसह शेअर केला इमोशनल फोटो

By बाळकृष्ण परब | Published: January 12, 2021 07:57 PM2021-01-12T19:57:26+5:302021-01-12T20:11:25+5:30

covishield vaccine Update : कोरोनावरील लस लसीकरणासाठी रवाना झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एक भावून ट्विट केले आहे.

जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या फैलावानंतर आता देशात कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. १६ जानेवारीपासून देशातील आरोग्य कर्मचारी आणि अन्य फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोनाची लस दिली जाईल.

कोरोनाविरोधातील देशव्यापी लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून व्यापक योजना आखण्यात आली आहे. कोरोनावरील लसीसाठी सरकारने सीरम इन्स्टिट्युटशी करार केला असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच्या केंद्रातून आज कोरोनावरील लसीचे कंटेनर देशाच्या विविध भागात रवाना झाले आहेत.

दरम्यान, कोरोनावरील लस लसीकरणासाठी रवाना झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एक भावून ट्विट केले आहे.

अदर पूनावाला यांनी एकूण दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये पूनावाला हे लस रवाना करण्यात आलेल्या कंटेनरसोबत दिसत आहेत.

पूनावाला यांनी वितरणासाठी लस ज्या कंटेनरमधून रवाना झाली त्यासोबतचा फोटो तसेच गेल्या अनेक महिन्यापासून लसीचे उत्पादन करण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबतचा ग्रुप फोटो शेअर केला आहे. तसेच सीरम इन्स्टिट्युटसाठी हा इमोशनल क्षण असल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे.

तर दुसऱ्या फोटोमध्ये अदर पूनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्रुप फोटोमध्ये दिसत आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्युटने आतापर्यंत कोरोनावरील लसीचे एक कोटी १० लाख डोस सरकारला उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महिन्याला सहा ते सात कोटी लसीचे डोस तयार करण्याची संस्थेकडे क्षमता असल्याचे पूनावाला यांनी सांगितले.