दरवर्षी 1 लाख भारतीय स्विकारताहेत परदेशी नागरिकत्व, आतापर्यंत किती लोक गेले..?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:42 PM2022-07-25T20:42:29+5:302022-07-25T20:46:29+5:30

चांगली शिक्षण व्यवस्था आणि चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात स्थलांतरित झालेल्या बहुतेकांनी तिथले नागरिकत्व घ्यायला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकांचा परदेशी नागरिकत्व घेण्याचा कल खूप वाढला आहे. चांगली शिक्षण व्यवस्था आणि चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात स्थलांतरित झालेल्या बहुतेकांनी आता तिथले नागरिकत्व घ्यायला सुरुवात केली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 1 लाख लोक भारत सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच देशाचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय नागरिकांनी परदेशी नागरिकत्व घेतल्याची आकडेवारी मांडली होती.

2015 मध्ये 1,41,000 लोकांनी परदेशी नागरिकत्व घेतले होते, तर 2016 मध्ये ही संख्या 144,000 च्या पुढे गेली होती. 2019 पर्यंत ही संख्या वाढतच गेली.

2020 मध्ये कोरोनामुळे हा आकडा थोडासा खाली आला असला तरी 2021 पासून हा आकडा पुन्हा 100000 च्या जवळपास गेला. म्हणजेच दररोज 350 हून अधिक भारतीयांना परदेशी नागरिकत्व मिळत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चांगले शिक्षण, चांगल्या करिअरची हमी आणि आर्थिक समृद्धीच्या शोधात भारतीय परदेशात जात आहेत आणि तिथले नागरिकत्व घेऊन तिथे स्थायिक होत आहेत.

भारतातील मोठ्या प्रमाणात नोकर्‍या गमावणे, चांगल्या शिक्षण व्यवस्थेचा अभाव आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी व्यावसायिक वातावरणाचा अभाव ही स्थलांतराची सर्वात मोठी कारणे असल्याचे अनेक शोधनिबंधांमधून समोर आले आहे.

2017 ते 2021 दरम्यान, इतर देशांचे नागरिकत्व घेणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी 42% भारतीयांची अमेरिका ही पहिली पसंती आहे. कॅनडा दुसऱ्या क्रमांकावर असून, तिथे गेल्या 5 वर्षात 91,000 भारतीय लोकांनी नागरिकत्व मिळवले आहे.

ऑस्ट्रेलिया 86,000 लोकांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर 66,000 लोकांसह इंग्लंड आणि 23,000 लोकांसह इटली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.