Exit Poll Fail: दिल्लीत केजरीवाल जिंकले, पण सगळे एक्झिट पोल पडले; गुजरात, हिमाचलमध्ये धाकधुक वाढली By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 06:19 PM 2022-12-07T18:19:31+5:30 2022-12-07T18:33:46+5:30
केजरीवालांनी भाजपाची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवून लावली पण परवा एक्झिट पोलनी जे आकडे सांगितलेले त्यात मोठा बदल झाला आहे. तोच बदल गुजरात, हिमाचलमध्ये उद्या झाला तर... दिल्ली महापालिकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आपला १३४, भाजपाला १०४, काँग्रेस ९ आणि इतर ३ जागा मिळाल्या आहेत. केजरीवालांनी भाजपाची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवून लावली आहे. असे असले तरी केजरीवालांची ११ टक्के मते कमी झाली आहेत. हा चिंतेचा विषय आहेच, परंतू दिल्लीत आप जिंकण्याचे भविष्य करणारे एक्झिट पोलचे आकडे मात्र साफ चुकले आहेत.
यामुळे उद्या जाहीर होणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची उत्सुकता आणि धाकधुकही वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी गुजरात, हिमाचल प्रदेशसह दिल्ली महापालिका निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले होते. यात दिल्लीत आप प्रचंड बहुमताने जिंकत असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, आज प्रत्यक्षात त्यात मोठा बदल झाला असून एकच दिलासा देणारी बाब म्हणजे आप जिंकली आहे.
एक्झिट पोल करणाऱ्या बड्या बड्या कंपन्यांनी दिल्लीत भाजपाचा दारुण पराभव दाखविला होता. भाजपाला ७० ते ९४ जागा दाखविण्यात आल्या होत्या. तर आपला १४६ ते १७५ जागा दाखविण्यात आल्या होत्या. इंडिया टुडे एक्सिस माइ इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आपला १४९ ते १७१ जागा मिळताना दिसत होत्या. भाजपाला ६९ ते ९१ जागा तर काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळताना दिसत होत्या.
आता गुजरातमध्ये काय भाकीत... गुजरातमध्ये भाजपाला ११७ ते १४० जागा मिळताना दाखविण्यात आल्या आहेत. तर काँग्रेसला ३० ते ५० जागा, आपला २ ते १३ जागा मिळताना दाखविण्यात आले आहे. जर हे एक्झिट पोल दिल्लीसारखेच चुकले तर भाजपा जिंकेलच परंतू जागांचे अंतर कमी अधिक होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये आपला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यावेळी आमदार निवडून जाणार आहेत. पंजाबसारखीच पाऊले आप इथे टाकण्याची शक्यता आहे.
सर्वात मजा हिमाचलमध्ये... दिल्लीच्या आजच्या एक्झिट पोल फसल्याची सर्वाधिक मजा हिमाचल प्रदेशमध्ये पाहता येण्याची शक्यता आहे. तिथे भाजपाची आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत येण्यासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. दोन चार जागा जरी इकडे तिकडे झाल्या तरी भाजपाची सत्ता जाऊन काँग्रेस सत्तेत बसण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियानुसार सत्ताधारी भाजपाला 24-34 जागा, काँग्रेसला 30-40, आपला भोपळा आणि इतरांना 4-8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पी मार्कनुसार भाजपाला काठावर सत्ता राखताना दाखविले आहे. भाजपाला 34-39, काँग्रेसला 28-33, आपला एक जागा दाखविण्यात आली आहे. जन की बातचेही आकडे तसेच आहेत. भाजपाला 32-40, काँग्रेसला 27-34, इतरांना १-२ जागा दाखविण्यात आल्या आहेत.
हिमाचल प्रदेशच्या एक्झिट पोलची आकडेवारी पाहता भाजपा काठावर पास होण्याची शक्यता आहे. तसेच सत्तेसाठी इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसही त्याच आसपास असल्याने काँग्रेसलाही सत्ता स्थापन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलबाबतही सुरुवातीपासूनच अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक्झिट पोलचे आकलन अनेकदा चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे आणि अनेक वेळा आकड्यांमध्ये प्रचंड फेरफारही दिसून आला आहे. एक्झिट पोलची विश्वासार्हता बहुतेक निकालांच्या जवळची आहे. अनेक वेळा अंदाजांमध्ये तफावत आली आहे, असे एक्झिट पोलचे विश्लेषकही मान्य करत आहेत.