Assembly Election 2022: समोसा, पीपीई किट, हवन-पूजा अन् बरंच काही; उमेदवारांना द्यावा लागणार हिशोब, अशी आहे ECच्या दरांची यादी By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:10 PM 2022-01-13T21:10:43+5:30 2022-01-13T21:23:47+5:30
देशात कोरना महामारीच्या काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक देखील घेतली जात आहे. यावेळी निवडणूक आयोगानं उमेदवारांना प्रचारखर्चात वाढ करुन दिली असली तर प्रत्येक खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. जाणून घेऊयात निवडणूक आयोगाचं रेट कार्ड नेमकं कसं आहे... देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगानं निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. यावेळी निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या प्रचारखर्चाच्या मर्यादेत वाढ केली असली तरी काही दर निश्चित करुन दिले आहेत.
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या प्रचार खर्चाचा सविस्तर तपशील द्यावा लागणार आहे. यात कोरोना प्रोटोकॉलनुसार वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचा देखील समावेश यावेळी करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुका कोरोना नियमांचं पालन करुनच घेतल्या जाणार आहेत. यासाठी काही नियम आयोगानं राजकीय पक्षांना लागू केले आहेत. निवडणूक आयोगानं प्रत्येक उमेदवाराला खानपानाच्या गोष्टींसोबतच मास्क, सॅनिटायझर, साबण, पीपीई किटसह इतर खर्चांचाही तपशील देण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक काळात केल्या जाणाऱ्या प्रत्येक खर्चाचा तपशील उमेदवाराला द्यावा लागणार आहे. उमेदवार ४० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करू शकणार नाहीत. यासाठी निवडणूक आयोगानं सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन खर्चाची एक रेट लिस्ट देखील तयार केली आहे.
कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत येणाऱ्या गोष्टींचाही यंदा निवडणूक खर्चात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा पातळीवर तक्रार कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे. यात निवडणुकीसंदर्भातील तक्रार करता येणार आहे.
अशी आहे खर्चाची 'रेट लिस्ट' पीपीई किट- ३०० रुपये प्रतिनग, थ्री-लेअर मास्क- २ रुपये एकनग, सॅनिटायझर 100ML- १८ रुपये प्रतिनग, सॅनिटायझर 500ML- ६७ रुपये प्रतिनग, सॅनिटायझर 1000ML- १३० रुपये प्रतिनग, सॅनिटायझर 5000ML- ६०० रुपये प्रतिनग, लिक्विड साबण 250ML- ५५ रुपये प्रतिनग
फेसशील्ड- ३० रुपये प्रतिनग, प्लास्टिक ग्लोव्ह्ज ६० पैसे प्रतिनग, रबर ग्लोव्ह्ज- ६ रुपये प्रतिनग, थर्मल स्कॅनर- ९७३ रुपये प्रतिनग
खाण्याच्या पदार्थांचेही दर निश्चित चहा- ७ रुपये, कॉफी- १० रुपये, समोसा-पकोडे- १० रुपये, मिनिरल वॉटर- २० रुपये प्रति बॉटल, लाडू- २०० रुपये प्रतिकिलो, नमकीन १८० रुपये प्रतिकिलो, बिस्किट ३०० रुपये प्रतिकिलो
भटजींच्या माध्यमातून हवन किंवा पूजा केली गेल्यास त्याचाही तपशील उमेदवारांना द्यावा लागणार आहे. यासाठी ११०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय प्रचारासाठी ऑफिस आणि गाडी, पोस्टर इत्यादी गोष्टींसाठीही दर निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवारांना बँक खातं देखील उघडावं लागणार आहे आणि त्याच खात्यातून सर्व खर्च करावा लागणार आहे.