अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्तीनं पाणी गिळलं, कुटुंबीयांनी रुग्णालयात नेलं अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 07:57 PM 2020-07-25T19:57:46+5:30 2020-07-25T20:00:44+5:30
अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्तीनं पाणी गिळल्याचा प्रकार कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडला. शुक्रवारी घडलेल्या या घटनेची सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.
हुबळीत राहणारे इराण्णा कांबळे यांचं हदयक्रिया बंद पडल्यानं निधन झालं. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
शुक्रवारी इराण्णा कांबळे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे कुटुंबावर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करताना त्यांना अंघोळ घालण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मुखात घातलेलं पाणी ते गिळत असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं.
इराण्णा यांना केआयएमएस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. मात्र अंत्यसंस्कारावेळी पाणी गिळत नसल्याचं ते जिवंत असावेत, असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटलं.
कुटुंबीय आणि नातेवाईकांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. अंत्यसंस्कारावेळी पाणी गिळल्यानं कुटुंबीयांना डॉक्टर काहीतरी सकारात्मक माहिती देतील, अशी आशा होती.
जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी इराण्णा यांना तपासून ते मृत असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबीयांनी इराण्णा यांचं पार्थिव घेऊन गाव गाठलं. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच असाच एक प्रकार घडला होता. एक व्यक्ती मृत पावल्याचं त्याच्या मित्रांना वाटत होतं. त्यामुळे मृताशेजारी असलेले मित्र शोकमग्न होते.
त्यावेळी एका स्थानिक छायाचित्रकाराला मृताच्या तोंडून आवाज ऐकू आला. त्यामुळे छायाचित्रकार मृतदेहाच्या जवळ गेला. तरीही आवाज ऐकू येत होता.
छायाचित्रकारानं याची माहिती इतरांना दिली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात नेलं. त्यानंतर संबंधित व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं.