पाच कारणं ज्यामुळे रेखा गुप्ता यांना भाजपानं बनवलं दिल्लीचं मुख्यमंत्री, अशी आहे रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:46 IST2025-02-20T12:42:21+5:302025-02-20T12:46:24+5:30
Rekha Gupta: भाजपाच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुमारे १०-१२ दिवस विचारमंथन केल्यावर भाजपाने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

भाजपाच्या नेत्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुमारे १०-१२ दिवस विचारमंथन केल्यावर भाजपाने दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत, याआधी सुषमा स्वराज, शीला दीक्षित, आतिशी यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रिपद सांभाळलेलं आहे. भाजपाने पक्षातील अनेक बड्या नेत्यांची नावं बाजूला करत रेखा गुप्ता यांच्या नावावर का शिक्कामोर्तब केलं, याची पाच महत्त्वाची कारणं समोर येत आहेत. ती पुढीलप्रमाणे.
पहिलं कारण म्हणजे रेखा गुप्ता ह्या एक युवा नेत्या आहेत. त्यांच्या कुटुंबाची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे.
दुसरं कारण म्हणजे रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करणं हे भाजपाच्या नव्या पिढीतील नेत्यांना पुढे आणण्याच्या भाजपाच्या रणनीतीला अनुकूल आहे.
तिसरं कारण म्हणजे भाजपाने रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करून संघटनेच्या शक्तीवर भर दिला आहे. तसेच पक्षाच्या समर्पित कार्यकर्त्यांना पुरस्कृत केलं असल्याचं दाखवून दिलं आहे.
चौथं कारण म्हणजे रेखा गुप्ता ह्या अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळापासून दिल्लीमध्ये पक्षाची ओळख राहिलेल्या आहेत. तसेच एबीव्हीपीपासून ते आता दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भूषणवण्यापर्यंत कार्य केलं आहे.
पाचवं कारण म्हणजे रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास हा आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या पक्षाच्या कटिबद्धतेला दर्शवतो.
आता आम आदमी पक्षाचं कडवं आव्हान मोडून दिल्लीमध्ये सत्तेत आलेल्या भाजपाची दिल्लीत पाळंमुळं मजबूत करून पक्षाने दर्शवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचं आव्हान रेखा गुप्ता यांच्यासमोर आहे.