माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याकडे मोठी जबाबदारी; आता पंतप्रधान मोदींसोबत करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 19:16 IST2025-02-22T19:10:39+5:302025-02-22T19:16:42+5:30
केंद्र सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या समितीने शनिवारी ही नियुक्ती केली. समितीचे सचिव मनीष सक्सेना यांनी नियुक्तीबाबत माहिती दिली.
"मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. ही नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून लागू होईल. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळात किंवा पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहील," असं केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
शक्तीकांत दास १० डिसेंबर रोजी आरबीआयच्या गव्हर्नर पदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर आता २२ फेब्रुवारी रोजी त्यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. निवृत्तीनंतरच्या नियुक्तीच्या ७५ व्या दिवशी ते पंतप्रधान कार्यालयातील महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर असण्याव्यतिरिक्त, शक्तिकांत दास यांनी भारताचे जी२० शेर्पा आणि ५ व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. ४२ वर्षांच्या कारकिर्दीत दास यांनी वित्त, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात काम केले आहे.
शक्तिकांता दास यांनी सेंट स्टीफन कॉलेज, दिल्ली येथून इतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली. त्याचबरोबर त्यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठातून लोक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शक्तिकांता दास यांना चार दशकांहून अधिक काळातील शासनाच्या विविध क्षेत्रांचा व्यापक अनुभव आहे.
आरबीआय गव्हर्नर या नात्याने शक्तिकांत दास यांनी कोविड महामारीच्या काळात भारताची आर्थिक स्थिरता मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली. जागतिक आव्हानांमध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणामही कमी केला.
सध्या पीके मिश्रा हे पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी पहिल्या क्रमांकावर आहेत. शक्तीकांता दास दुसऱ्या क्रमांकावर असतील. दास हे तामिळनाडू केडरचे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तर मिश्रा हे गुजरात केडरचे निवृत्त अधिकारी आहेत.