गंभीर बाहेर पडण्यामागं 'राज'कारण; लोकसभेच्या तोंडावर मोठा निर्णय, 'आप'ने डिवचलं By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 04:17 PM 2024-03-02T16:17:38+5:30 2024-03-02T16:29:16+5:30
गौतम गंभीरने राजकारणातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या तापट स्वभावामुळे चर्चेत राहणाऱ्या या दिग्गज खेळाडूने राजकारणात प्रवेश करून सर्वांनाच चकित केले होते. मात्र आता अचानक राजकारणातून बाहेर पडत असल्याचे त्याने जाहीर केले आहे.
गंभीरने अचानक राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर करून सर्वांना बुचकळ्यात टाकले. शनिवारी गंभीरने भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांना आपल्याला दिलेल्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली.
त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत राजकारणातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. तो भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून निवडणूक जिंकला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून गंभीर खासदार झाला.
गंभीरला गेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळाला होता. २०१९ मध्ये त्याने काँग्रेसचे उमेदवार अरविंदर सिंग लवली यांचा तब्बल ३,९१,२२२ मतांनी पराभव केला. जनतेची सेवा केल्यानंतर गंभीरने आता केवळ एका टर्मनंतर राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला.
भाजपा खासदार गौतम गंभीरने शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट जारी करून यापुढे राजकारण करणार नसल्याची माहिती दिली. गंभीरने लिहिले की, मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या भविष्यातील क्रिकेट वचनबद्धतेवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकेन.
तसेच मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानू इच्छितो, जय हिंद, असे गंभीरने नमूद केले.
गंभीरने राजकारण सोडल्यानंतर दिल्लीतील सत्ताधारी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी त्याच्यावर टीका केली. तसेच भाजपा त्याचे तिकिट कापणार असल्यामुळे गंभीरने हा निर्णय घेतला असल्याचे 'आप'च्या नेत्यांनी सांगितले.
आम आदमी पक्षाचे आमदार कुलदीप कुमार यांनी सांगितले की, गंभीर दिल्लीतील लोकांना भेटत नव्हता. कोणाच्या सुख दु:खात त्याचा सहभाग नसायचा. एकाही बैठकीला त्याने हजेरी लावली नाही. तो फक्त बोलायचा पण त्याचा काहीच जनसंपर्क नव्हता.
याशिवाय दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गंभीरवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, गौतम गंभीरने राजकारणातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. यातून स्पष्ट होते की, भाजपा त्याचे तिकिट कापणार होती. भाजपाचा ट्रेंड असाच राहिला आहे. आधी कोणालाही तिकीट देतात, मग त्याला डावलतात. गौतम गंभीरने गेल्या पाच वर्षांपासून आपल्या क्षेत्रात कोणतेही काम केलेले नाही. तो खासदार असूनही मतदारसंघात फिरला नाही.
दरम्यान, गौतम गंभीरने डिसेंबर २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी ५८ कसोटी, १४७ वन डे आणि ३७ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. तो वन डे विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता.
क्रिकेटला अलविदा केल्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकून तो खासदार झाला. राजकारणासोबतच त्याने २०२४ पर्यंत क्रिकेटची बांधिलकीही कायम ठेवली. आता त्याला फूट टाईम क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. म्हणूनच गंभीरने राजकारण सोडले.