1 मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार Corona Vaccine; जाणून घ्या, लसीकरणासाठी कसं करायचं रजिस्ट्रेशन? By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 10:27 AM 2021-02-27T10:27:57+5:30 2021-02-27T10:45:27+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. देशात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचा वेग मंदावलेला पाहायला मिळाला होता. मात्र आता नव्या स्ट्रेनमुळे पुन्हा लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,10,79,979 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,488 नवे रुग्ण आढळले आहेत तर 113 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,56,938 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन केले जात आहे. कोरोना चाचणीचे प्रमाण देखील वाढवण्यात आले आहे.
जगभरातील विविध देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात ही कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून अनेकांनी कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींचा या लसीकरणात समावेश आहे.
सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रावर शुल्क घेऊन लस दिली जाईल.
कोरोना लसीसाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. एक मार्चपासून ऑनलाईन नोंदणी करू शकता. Co-Win App 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. तोपर्यंत ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
को-विन (Co-Win), आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅप या मोबाईल अॅपच्या माध्यमातून किंवा cowin.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. लस घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रथम ‘को-विन’ अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून नावाची नोंदणी करावी लागेल.
ऑनलाइन नोंदणी करताना सर्वात आधी तुमचा मोबाइल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला अकाऊंट तयार करण्यासाठी ओटीपी मिळेल. यानंतर तुमचं नाव, वय, लिंग आणि आवश्यक ओळखपत्रं अपलोड करा.
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल पण तुमचं वय 45 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला इतर आजार असेल तर तुम्हाला असलेल्या आजाराचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर ही सुविधा मिळू शकेल.
तुम्हाला मोबाईल अॅप किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या सेवा केंद्रांवर जाऊन तिथं आपली नोंदणी करू शकता. खासगी केंद्रे व रुग्णालयांत या लसीसाठी ठरावीक शुल्क आकारले जाईल.
नावनोंदणी करणाऱ्याला आपले आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक तसेच वयाचा पुरावा ही माहिती भरावी लागेल. ही सर्व माहिती योग्य असल्यास त्या इच्छुकाचे नाव लसीकरणासाठी को-विन अॅपमध्ये नोंदविले जाईल.
कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढही होताना दिसत आहे. अशा परिस्थिती केंद्र सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे.
कोरोना विषाणूबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचं 31 मार्चपर्यंत पालन करण्याचे आदेश दिले आहे. कोरोना विषाणूविरोधातील लढाई पूर्णपणे जिंकण्यासाठी खबरदारी घेणं आणि कठोरपणे देखरेख ठेवण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
'गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या सख्येत घट दिसून आली आहे. परंतु कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आताही आपल्याला कठोर देखरेख आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. 27 जानेवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेले आदेश 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात येत आहेत,' असं गृह सचिवांच्यावतीने पत्रात नमूद करण्यात आलं आहे.