Railway's Rail Karmayogi: खूशखबर! ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? डबा कुठे असणार? रेल्वेचा 'कर्मयोगी' उभा ठाकणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 04:21 PM 2022-05-05T16:21:42+5:30 2022-05-05T16:29:02+5:30
Rail Karmayogi appointment on Railway Stations to help Passengers: रेल्वे कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल, डबा पुढे असेल की मागे, ट्रेन आल्यावर धावाधाव तर होणार नाही ना, आदींचे खूप टेन्शन असते. रेल्वे प्रवासाची सवय नसलेल्यांना किंवा कधीतरीच प्रवास करणाऱ्यांना रेल्वे कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल, डबा पुढे असेल की मागे, ट्रेन आल्यावर धावाधाव तर होणार नाही ना, आदींचे खूप टेन्शन असते. सराईत असला तरी देखील त्याच्यासोबत घरची मंडळी, बॅगा असल्यावर त्याचीही अशीच पंचाईत होते. म्हणजेच काय, बहुतांश लोकांची तारांबळ उडते.
कोणाला विचारले तर उत्तर आले तर बरे, चुकीचे सांगितले तर आगीतून फुफाट्यात. अनेकदा तर प्रवासी एका प्लॅटफॉर्मवर थांबलेले असतात आणि ट्रेन दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर येते. मग काय पळा... हा तुमचा त्रास रेल्वे महामंडळ कमी करणार आहे.
एवढेच नाही तर तुम्ही बुकिंग काऊंटरवर उभे असाल परंतू डिजिटल पेमेंट करण्यास अडचणी असतील किंवा अन्य कोणत्याही अडचणी असतील तर तुम्हाला कोण मदत करतो? तिथे कोणीच तुमचे ऐकणारा नसतो. स्टेशन मास्तर तर एवढा बिझी की देशाचा रेल्वेमंत्री देखील तेवढा बिझी नसेल.
या साऱ्या त्रासांवर उपाय म्हणून रेल्वे एक असा व्यक्ती प्रत्येक ठिकाणी उभा करणार आहे, जो तुमच्या समस्या सोडवेल. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देईल. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल, डबा कुठेअसेल आदी सारी माहिती देईल. होय, रेल्वे मंत्रालय मोठ्या स्थानकांवर रेल्वे कर्मयोगी (Rail Karmyogi) ची तैनाती करणार आहे.
आतापर्यंत ५० हजार हून अधिक कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैश्नव यांनी ट्विट करून दिली आहे. हे कर्मयोगी नेमके काय काम करणार? कशी तुम्हाला मदत करणार?
मिशन कर्मयोगी हा उपक्रम रेल्वे प्रवासी किंवा रेल्वे ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत देशभरात किमान एक लाख रेल कर्मयोगी तयार केले जात आहेत. लखनौस्थित इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट (IRITM) ला रेल्वे कर्मयोगी प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या मिशन अंतर्गत दोन टप्प्यांत काम केले जात आहे. सर्वप्रथम, रेल्वेच्या सर्व विभागांमधून 1,100 मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना संस्थेत पाच दिवस तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर ते त्यांच्या विभागात जाऊन फील्ड स्टाफला प्रशिक्षण देतील. सध्या ४९ विभागीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे IRITM महासंचालक चंद्रलेखा मुखर्जी यांनी म्हटले.
जर एखादा प्रवासी बुकिंग काउंटरवर उभा असेल आणि त्याला फॉर्म भरता येत नसेल. एखाद्या प्रवाशाला तिकीट काढण्यासाठी डिजिटल पेमेंट करायचे असेल, परंतु ते त्याला जमत नसेल तर हे रेल्वे कर्मचारी अशा प्रवाशांना मदत करणार आहेत.
ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाची तब्येत बिघडली किंवा वैद्यकीय मदतीची गरज असेल तर हे कर्मयोगी डॉक्टरांना बोलवण्यात मदत करतील. प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास त्याला रुग्णालयात नेण्यासही ते मदत करतील.
एखाद्या प्रवाशाचे सामान हरवले किंवा इतर काही समस्या असल्यास कर्मयोगी त्यांना जीआरपी आणि आरपीएफकडे घेऊन जातील. त्यांना तक्रार लिहून घेण्यास मदत करतील.
तिकीट वेटिंगवर असेल तर... कर्मयोगी प्रवाशांना योग्य डब्यात चढण्यास मदत करतील. ज्या प्रवाशांची तिकिटे प्रतीक्षा यादीत असतील व डब्यातील बर्थ रिकामे असल्यास त्यांना बर्थ मिळण्यास मदत केली जाईल. एवढेच नव्हे तर रेल्वेशी व्यावसायिक संबंध असलेल्या व्यावसायिकांनाही कर्मयोगी सेवा मिळणार आहे.