रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आता तिकीटही करता येणार दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 02:40 PM2019-02-17T14:40:09+5:302019-02-17T14:45:30+5:30

भारतीय रेल्वेने कात टाकण्यास सुरुवात केली असून ऑनलाईन अॅपद्वारे सोप्या पद्धतीने तिकिट आरक्षण करण्याची सोय केली आहे. शिवाय प्रवाशाने तक्रार केल्यास त्यावर तातडीने सेवाही पुरविण्यात येत आहे.

आता रेल्वेने आणखी एक चांगला निर्णय घेतला आहे. आरक्षित केलेले तिकिट यापुढे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करता येणार आहे.

बऱ्याचदा असे होते की, आगाऊ दोन-तीन महिने आधी आपण रेल्वे प्रवासाचे तिकिट काढतो. मात्र, काही कारणांमुळे आपण जाऊ शकत नाही. यामुळे एक दिवस आधीच तिकिट रद्द करावे लागते. या तिकिटाचे रद्द करताना काही पैसे कापून घेतले जातात.

मात्र, आता हे तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करण्याची सोय रेल्वेने दिली आहे. यासाठी प्रवासाच्या 24 तास आधी काही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. तसेच या सेवेचा लाभ तुम्ही एकदाच घेऊ शकता. चला नवीन नियम काय आहे पाहू.

सर्वात आधी तुमच्या आरक्षित तिकिटाची झेरॉक्स किंवा प्रिंट आऊट काढावी.

यानंतर जवळच्या रेल्वे स्थानकावर जावे. ज्या व्यक्तीला हे तिकिट ट्रान्सफर करायचे आहे, त्याचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.

तिकिट खिडकीवरील कर्मचाऱ्याकडे प्रवाशाचे नाव बदलण्यासाठी अर्ज करावा. नात्यातील व्यक्ती असल्यास नात्याचे ओळखपत्र म्हणजेच रेशनकार्ड, आधारकार्ड आदी दाखवावे लागणार आहे.