Gujarat Election: भाजपाच्या आमदारांत खळबळ उडाली! गुजरातमध्ये तिकीट वाटपाचा ऐनवेळी फॉर्म्युला बदलला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:15 PM2022-10-26T12:15:05+5:302022-10-26T12:19:14+5:30

गुजरात आणि मोदी असे समीकरण असल्याने तिथे होणारे नुकसान मोदींना पर्यायाने भाजपाला देशभरात नुकसान करणारे ठरणार आहे.

भाजपा गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात गुंतला आहे. गुजरात आणि मोदी असे समीकरण असल्याने तिथे होणारे नुकसान मोदींना पर्यायाने भाजपाला देशभरात नुकसान करणारे ठरणार आहे. यामुळे गुजरातचा किल्ला अबाधित ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नात आहे. यासाठी उमेदवार निवडताना नेहमीचा फॉर्म्युला नाही तर हिमाचल मॉडेल अवलंबनार आहे. यामुळे भाजपाच्या विद्यमान आमदारांसह इच्छुकांमध्ये खळबळ उडाली आहे.

यासाठी भाजपाने अहमदाबाद, बडोदा, सूरत आणि जामनगर अशा विभागांत राज्याची विभागणी केली आहे. या विभागांतील प्रत्येक विधानसभा जागेवर पर्यवेक्षक तैनात करण्यात आले आहेत. हे पर्यवेक्षक २७ ते २९ ऑक्टोबर या काळात तेथील भाजपा कार्यकर्ते आणि भाजपाचे प्रभावशाली समर्थक यांची भेट घेणार आहेत.

त्यांच्याकडून जमिनीवरील माहिती मिळविली जाणार आहे. या फीडबॅकनंतर फायनल रिपोर्ट तयार केला जाणार असून त्यानंतर पक्ष उमेदवारी कोणाला द्यायाची याचा निर्णय घेणार आहे. विधानसभेचे विद्यमान आमदार आणि त्या भागातील भाजपच्या अन्य नेत्यांबद्दलच्या सर्वसामान्यांच्या भावना, मते विचारात घेतली जाणार आहेत. यामुळे भाजपाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवायचे असेल तर सद्यस्थितीत कोणत्याही उमेदवाराला स्वत:ची वेगळी प्रतिमा आणि मतदाराला बांधून ठेवलेले असले पाहिजे. केवळ केडर मतांच्या जोरावर असलेल्या उमेदवारांना बाहेरचा रस्ता दाखविला जाणार आहे, असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले.

उमेदवाराबाबत किंवा आमदाराबाबत नकारात्मक रिपोर्ट आला तर त्याला नारळ दिला जाणार आहे. राज्यातील २५ टक्के जागांवर नव्या चेहऱ्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल, असे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या. अमित शाह सहा दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. काही दिवसांसाठी ते दिल्लीत परतणार असून पुन्हा ३१ ऑक्टोबरला ते गुजरातला परतणार आहेत.