Gujarat Election: गुजरात निवडणुकीचा मुहूर्त चुकला! पंचांगात पाहून पंडितांनी केले मतदानावर 'भाकीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:39 PM2022-11-04T12:39:45+5:302022-11-04T12:44:29+5:30

निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. याच आठवड्यात गुजरातमध्ये लग्नसराई सुरु होणार असून थोडी थोडकी नव्हेत तर ३५ हजाराच्या आसपास लग्ने होणार असल्याचे भाकीत पंचांग आणि विवाह पंडीतांनी केले आहे. यामुळेमतदानाची टक्केवारी घसरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

विवाहादिवशीच मतदान असेल तर अनेकदा आपण फोटो पाहतो की, वधू वराने मतदानाचा हक्क बजावला. परंतू, ते त्याच मतदारसंघात किंवा पोलिंग बुथजवळ असल्यास शक्य आहे. पै पाहुणे मंडळी ही या त्या गावातून, जिल्ह्यातून येत असतात. अशावेळी ते त्याच दिवशी मतदान करून लग्नाला हजर राहू शकत नाहीत. तसेच गुजरातमधील लग्नांचे विधी आणि कार्यक्रम हे चार-पाच दिवस किंवा आठवडा आठवडा चालतात. यामुळे वऱ्हाडी मंडळी मतदानाला मोठ्या प्रमाणावर मुकण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात हजारो लग्न कार्यक्रम असल्याने पाहुणे मंडळी किंवा मुलीच्या गावी गेलेले मुलाकडचे किंवा मुलीकडचे मतदानाला मुकणार आहेत. लग्नसराईला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. गुजरातमध्ये कमूरताचा काळ सुरु होण्यापूर्वी कमीतकमी ८० हजारावर विवाह होणार आहेत.

पंचांगांचे अभ्यासक राजेंद्र दवे यांनी सांगितले की, लग्नाच्या सीझनमध्ये २ डिसेंबर, ४ आणि ८ डिसेंबरला चांगले मुहूर्त आहेत. या प्रत्येक दिवशी गुजरातमध्ये कमीतकमी १५ हजार तरी लग्ने लावली जातील. या तारखा १ आणि ५ डिसेंबरला मतदानाच्या आधी किंवा नंतरच्या दिवसाच्या आहेत. यामुळे लग्नासाठी या गावाहून त्या गावाला जाणारे नातेवाईक मतदान करण्याची शक्यता कमी आहे.

2019 नंतर कोविडमुळे आणि नंतर लॉकडाऊनमुळे अनेक लग्ने साधेपणानेच उरकण्यात आली. कुटुंबातील सदस्यही विवाहसोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते. अशा स्थितीत आता लग्नसमारंभात विक्रमी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आता पुढे ढकलण्यात आलेले विवाहही होत आहेत, त्यामुळे विवाहांची संख्याही वाढली आहे.

गेल्या दोन वर्षांचा बॅकलॉग या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भरून काढला जात आहे. लग्नाचा हंगाम आला आहे. ज्यांनी साथीच्या आजारामुळे समारंभ आयोजित केला नाही त्यांनी आता मुहूर्त काढला आहे. 1 ते 4 डिसेंबरपर्यंत अहमदाबादमधील बहुतेक लग्नाचे हॉल, रिसॉर्ट पूर्णपणे बुक झाले आहेत, असे एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्मचे संचालक पिंटू दंडवाला यांनी सांगितले.

सुरतमध्येही अशीच परिस्थिती आहे, जिथे शहरात डिसेंबरच्या प्रत्येक मुहूर्तावर किमान 200 विवाह होणार आहेत. कोरोनाचे निर्बंध उठवण्यात आल्याने विवाहसोहळ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरातील सर्व हॉल फुल झाले आहेत, असे दक्षिण गुजरात इव्हेंट मॅनेजमेंट असोसिएशनचे प्रमुख नीरव देसाई यांनी सांगितले.