सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 03:40 PM 2024-10-10T15:40:31+5:30 2024-10-10T15:50:17+5:30
हरियाणाची नवी विधानसभा आधीच्या विधानसभेपेक्षा श्रीमंत असेल. २०१९ च्या तुलनेत कोट्याधीश आमदारांची संख्याही वाढली आहे. १०० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेले पाच आमदार आहेत. या निवडणुकीत १० श्रीमंत उमेदवारांपैकी सर्व सात पुरुष उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले तर उर्वरित तीन महिला उमेदवार विजयी झाल्या. या निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार कॅप्टन अभिमन्यू होते. कॅप्टन अभिमन्यू यांनी त्यांची एकूण संपत्ती ४९१ कोटी रुपये असल्याचं घोषित केले. हिसार जिल्ह्यातील नारनौंद मतदारसंघातून ते भाजपाचे उमेदवार होते, पण काँग्रेसच्या जस्सी पेटवार यांनी त्यांचा पराभव केला.
काँग्रेसचे रोहतास सिंग दुसऱ्या क्रमांकावर होते. गुरुग्रामच्या सोहना मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या रोहतास यांच्याकडे ४८४ कोटींची संपत्ती आहे. रोहतास यांना या निवडणुकीत भाजपाच्या तेजपाल तन्वर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
हरियाणातील १० सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी तीन महिलाही होत्या. या निवडणुकीत सातही पुरुष पराभूत झाले, तर तीनही महिला उमेदवार यशस्वी ठरल्या. यामध्ये पहिले नाव देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचं आहे. हिसारमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सावित्री यांनी त्यांच्या नावावर २७० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली. २०२४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतही त्या तिसऱ्या सर्वात श्रीमंत उमेदवार होत्या. या निवडणुकीत सावित्री यांनी काँग्रेसच्या रामनिवास राडा यांचा पराभव केला आहे.
हरियाणात निवडणूक लढवणारे चौथे श्रीमंत उमेदवार अपक्ष कल्याण सिंह होते. गुरुग्रामच्या सोहना मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या कल्याण यांनी त्यांची संपत्ती २६५ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले. या निवडणुकीत ते सोहना मतदारसंघातून चौथ्या क्रमांकावर राहिले.
या निवडणुकीतील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार सुनील बन्सल होते. त्यांनी आपली एकूण संपत्ती १६५ कोटी रुपये असल्याचे घोषित केले. हिसार मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले सुनील या निवडणुकीच्या निकालात आठव्या क्रमांकावर राहिले.
हरियाणातील १० श्रीमंत उमेदवारांपैकी तिन्ही महिलांनी त्यांच्या निवडणुका जिंकल्या आणि या यादीत सावित्री जिंदालनंतर दुसरे नाव शक्ती राणी शर्मा आहे. भाजपाच्या शक्ती राणी शर्मा या हरियाणा विधानसभेच्या सहाव्या क्रमांकाच्या श्रीमंत उमेदवार होत्या. नव्या विधानसभेतील त्या दुसऱ्या सर्वात श्रीमंत आमदार असतील. पंचकुलाच्या कालका मतदारसंघातून विजयी झालेल्या शक्ती राणी यांच्याकडे १४५ कोटींची संपत्ती आहे.
या निवडणुकीतील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार मोहित ग्रोव्हर होते. त्यांनी आपली एकूण संपत्ती १४४ कोटी रुपये असल्याचे घोषित केले. गुरुग्राम मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले मोहित या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिले.
आठव्या क्रमांकाच्या श्रीमंत उमेदवारांमध्ये भाजपाच्या श्रुती चौधरी होत्या. भिवानी जिल्ह्यातील तोशाम मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या माजी लोकसभा खासदार श्रुती यांनी आपली संपत्ती १३४ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले. या निवडणुकीत त्यांनी तोशाम मतदारसंघातून चुलत भाऊ अनिरुद्ध चौधरी यांचा पराभव केला. २०२४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत श्रुती चौधरी या तिसऱ्या सर्वात श्रीमंत आमदार असतील. सावित्री जिंदाल आणि शक्ती राणी शर्मा यांच्यानंतर श्रुती हरियाणातील त्या तीन आमदारांपैकी एक आहे.
या निवडणुकीतील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार हरियाणा लोक हिट पार्टीचे गोपाल कांडा होते. त्यांनी आपली एकूण संपत्ती १३१ कोटी रुपये असल्याचे घोषित केले. सिरसा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले गोपाल कांडा यांना काँग्रेसचे उमेदवार गोकुळ सेटिया यांनी पराभूत केले.
दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला होते. जिंद जिल्ह्यातील उचाना कला मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या जेजेपी नेत्याने आपली संपत्ती १२२ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले. या निवडणुकीत ते पाचव्या स्थानावर राहिले.