धक्कादायक! देशात एकाच दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद; अमेरिका अन् ब्राझीललाही टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 02:55 PM2020-08-03T14:55:19+5:302020-08-03T15:03:51+5:30

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले असून बाधितांसह मृतांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी ७८ लाख झाली असून सहा लाख ८३ हजारजणांचा मृ्त्यू झाला आहे. तर, एक कोटी ११ लाखजणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिका आणि ब्राझीलमध्ये आहे.

अमेरिकेत २३ लाख २८ हजार, ब्राझीलमध्ये १८ लाख ८४ हजार आणि भारतात ११ लाख कोरोनाबाधितांनी आजारावर मात केली आहे. मात्र भारताने रविवारी अमेरिका आणि ब्राझीललाही मागे टाकले आहे.

जगभरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण भारतात आढळून आले आहे. देशात कोरोनाचे तब्बल 54,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत ४९ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ब्राझीलमध्ये कोरोनाच्या नव्या २४ हजार रुग्णांची नोंद झाली आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची एकूण संख्या 17 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 37,364 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

रविवारी (2 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 54,736 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 17,50,724 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 37 हजारांवर पोहोचला आहे.