हिमाचल प्रदेश पोटनिवडणूक: जगातील सर्वात उंचावरील टशिगंग मतदान केंद्रावर झालं १०० टक्के मतदान By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 11:02 AM 2021-10-31T11:02:32+5:30 2021-10-31T11:07:03+5:30
Worlds Highest Polling Station Tashigang: हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघासह अर्की, जुब्बल-कोटखाई आणि फतेहपूर विधानसभा सिटसाठी शनिवारी मतदान झाले. या दरम्यान, मंडी लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या देशातील आणि जगातील सर्वात उंच टशिगंग मतदान केंद्रावर तब्बल १०० टक्के मतदान झाले. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघासह अर्की, जुब्बल-कोटखाई आणि फतेहपूर विधानसभा सिटसाठी शनिवारी मतदान झाले. या दरम्यान, मंडी लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या देशातील आणि जगातील सर्वात उंच टशिगंग मतदान केंद्रावर तब्बल १०० टक्के मतदान झाले.
जगातील सर्वात उंच मतदान केंद्र आणि समुद्रसपाटीपासून १५ हजार २५६ फूट उंचीवर असलेल्या हिमाचल प्रदेशमधील टशिगंग गावात तापमान उणे १६ डिग्री सेल्सियस खाली असूनही १०० टक्के मतदान झाले. ही माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, टशिगंग मतदान केंद्रावर नोंदणी असलेल्या सर्व ४७ मतदारांनी (२९ पुरुष आणि १८ महिला) मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच निवडणूक अधिकाऱ्यांनीही सहाय्य पीठासीन अधिकाऱ्यांना निवडणूक ड्युटी प्रमाणपत्र दाखवून टशिगंग येथेच मतदान केले.
टशिगंगमध्ये पहिल्यांदा आपल्या मतदानाचा हक्क बजावणाऱ्या ताशी चोंगोम हिने सांगितले की, मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीमध्ये भूमिका निभावून ती आनंदित आहे. सर्वांनी मतदान केले पाहिजे, असे आवाहन तिने केले.
टशिगंग गाव हा लाहौल स्पिती जिल्ह्यात आणि मंडी लोकसभा मतदारसंघात येतो. मंडी लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नी आणि काँग्रेस उमेदवार प्रतिभा सिंह यांचा सामना भाजपा उमेदवार आणि कारगिल युद्धातील हिरो खुशाल ठाकूर यांच्यामध्ये आहे.
मंडी लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीसाठी ५७.७३ टक्के मतदान झाले. मंडी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत.
एवढेच नाही तर स्वतंत्र भारतातील पहिले मतदार १०४ वर्षीय श्याम सरण नेगी यांनीही किन्नौर जिल्ह्यातील कल्पा येथील आदर्श मतदान केंद्रावर मतदान केले. नेगी यांचे स्वागत करण्यासाठी रेड कार्पेट घालण्यात आले होते. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.