आणीबाणीचा इतिहास - ४९ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी रात्री १२ ते ४ वाजेपर्यंत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:05 AM2024-06-25T10:05:54+5:302024-06-25T10:10:35+5:30

२५ जून १९७५ रोजी मध्यरात्री ते पहाटे ४ वाजेपर्यंत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यालयात बैठक सुरू होती. त्यात इंदिरा यांचे विश्वासू पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे हेदेखील उपस्थित होते. देशात आणीबाणी कशी लावायची, कोणाला अटक करायची, अंमलबजावणी कशी करायची याचं नियोजन केले जात होते.

परदेशात सीक्रेट मिशनला यशस्वी करणारे रॉ चे अधिकारी ही यादी बनवत होते ज्यात कुणाला अटक करायची आणि कुणाला नाही. ही यादी इंदिरा गांधी यांना दाखवण्यात आली. जेव्हा आणीबाणीचा मसुदा तयार झाला तेव्हा इंदिरा गांधी या सिद्धार्थ शंकर रे यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात पोहचल्या.

आणीबाणीत जेलमध्ये जाणारे प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नैयर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की, २० जून रोजी इंदिरा गांधी यांनी एक रॅली केली होती. ज्यात अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहीन, मग ते कुठल्याही पदावर असो, सेवा करणे ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे असं त्या रॅलीत म्हटलं होतं.

पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात इंदिरा गांधी यांनी कुटुंबावर भाष्य केले होते. त्यावेळी व्यासपीठावर संजय, राजीव आणि त्यांची पत्नी सोनिया गांधी उपस्थित होते. एक शक्ती मला केवळ सत्तेवरून दूर करायला नव्हे तर माझं जीवन संपवायची इच्छा ठेवतेय. लक्ष्य गाठण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं जातंय असा आरोप इंदिरा गांधी यांनी केला होता.

इंदिरा गांधी यांनी विश्वासू आणि लहानपणीचे मित्र सिद्धार्थ शंकर रे यांना कोलकाताहून बोलावले. २४ जूनला चर्चेवेळी सिद्धार्थ शंकर रे यांनी इंदिरा यांना देशात आणीबाणी लावण्याचा सल्ला दिला. त्यावेळी एकाला तातडीने संसदेच्या लायब्रेरीमधील संविधानाची प्रत आणायला पाठवली.

पंतप्रधान कार्यालयाने आणीबाणी लावण्यापूर्वी एक संदेश आधीपासूनच तयार केला होता. आणीबाणीच्या काळात केंद्राला कुठल्याही राज्याला काहीही आदेश देण्याचा अधिकार होता. संविधानाच्या कलम १४, १९ मधील सर्व मुलभूत अधिकार निलंबित करू शकत होता. हे अधिकार लागू करण्याबाबत कुठल्याही याचिकेला स्वीकारू नका असा आदेश कोर्टाला दिला जाऊ शकत होता.

सिध्दार्थ शंकर रे यांना आणीबाणीमागील मास्टरमाईंड मानलं जाते. काही लेखक इंदिरा गांधी यांच्याच डोक्यातून आणीबाणीचा विचार आल्याचं बोलतात. इंदिरा गांधी यांनी सचिवाला बोलावून आणीबाणीच्या घोषणेबाबत सांगितले. त्यानंतर आणीबाणीचा प्रस्ताव लिहिला गेला. सर्व कागदपत्रे घेऊन राष्ट्रपती भवनात गेले.

आणीबाणी लागू होण्याच्या ३ तासानंतर इंदिरा गांधी झोपायला गेल्या आणि देशभरात अटक सत्र सुरू झालं. सर्वात आधी जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांना ताब्यात घेतले. आणीबाणीच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेतली गेली. जोपर्यंत आणीबाणी लागू होत नाही तोवर कायदे मंत्री एचआर गोखले यांनाही कल्पना नव्हती.

कुलदीप नैयर यांच्या पुस्तकानुसार, आणीबाणी लागू होण्याच्या ४ तासापूर्वी इंदिरा गांधी या सहकारी सिद्धार्थ शंकर रे यांच्यासोबत राष्ट्रपती भवनात पोहचल्या. त्याठिकाणी सिद्धार्थ रे यांना आणीबाणीचा अर्थ काय हे समजवण्यासाठी जवळपास ४५ मिनिटे गेली. राष्ट्रपतींना आणीबाणीचे परिणाम समजण्यास वेळ लागला नाही. त्यांनी विरोध न दर्शवता त्याला मान्यता दिली. कारण इंदिरा गांधी यांच्यामुळेच देशाच्या सर्वोच्च पदावर बसण्याचा मान त्यांना मिळाला होता. राष्ट्रपती यांनी रात्री ११.४५ मिनिटांनी आणीबाणी लागू करण्याच्या घोषणेवर स्वाक्षरी केली.

२५ जूनला जेपी नारायण यांची रॅली होती विरोधक त्याच्या तयारीत होते. देशभरात २९ जूनला मोठं आंदोलन उभारू जेणेकरून इंदिरा गांधी या पदाचा राजीनामा देतील अशी घोषणा जयप्रकाश नारायण यांनी केली होती. पोलीस, संरक्षण दलानं इंदिरा गांधी यांचं ऐकू नये असं आवाहनही त्यांनी केले होते.