दिल्लीत सुरू झालं असं रुग्णालयं ज्यात 'बिलिंग काऊंटर'च नाही, मोफत होणार सर्व उपचार! By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 01:10 PM 2021-03-09T13:10:37+5:30 2021-03-09T13:14:30+5:30
दिल्लीतील एक रुग्णालय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या रुग्णालयात गरीबांना मोफत उपचार आणि स्वस्तात औषधं मिळणार आहेत. अतिशय 'हायटेक' सुविधांनी सज्ज असलेलं हे रुग्णालय एकदा पाहा... दिल्लीत सुरू करण्यात आलेल्या या रुग्णालयात हायटेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णालयात एकही 'बिलिंग काऊंटर' नाही, कारण येथे रुग्णांकडून कोणतीही फी घेतली जात नाही. इतकंच काय तुम्हाला रजिस्ट्रेशन देखील करावं लागत नाही.
देशातील हे सर्वात मोठं डायलिसीस रुग्णालय असलाचा दावा केला जात आहे. दिल्लीतील शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीनं (डीएसजीपीसी) या रुग्णालयाची सुरुवात केली आहे. यात किडनी संदर्भातील आजार असलेल्या रुग्णांवर अतिशय महागडे उपचार अगदी मोफत केले जातात.
दिल्लीच्या शिख गुरुद्वारा कमिटीनं सुरू केलेल्या या रुग्णालयात १०१ खाटांची सुविधा आहे. हे रुग्णालय बाला साहिब गुरुद्वारामध्ये उभारण्यात आलं आहे.
गुरू हरिकिशन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च असं या रुग्णालयाचं नाव आहे. यात १०० डायलिसीस मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत आणि दैनंदिन स्वरुपात तब्बल ५०० गरीब रुग्णांवर येथे मोफत उपचार होऊ शकतात. याशिवाय, औषधं देखील मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.
रुग्णालयाच्याच परिसरात गुरू हरिकिशन डिस्पेंसरीचं काम देखील सुरू आहे. यात रुग्णांना एमआरआय आणि सिटी स्कॅनसारख्या सुविधा अतिशय रास्त दरात उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
कमीत कमी पैशात रुग्णांना एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स रे आणि इतर चाचण्या करता येणार आहेत. यासोबतच स्वस्त दरात औषधं देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.