पंतप्रधान आवास योजनेचे पैसे फसवणूक करून घेतल्यास दंड किती? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:12 IST2024-12-07T16:59:01+5:302024-12-07T17:12:35+5:30
PM Awas Yojana : सरकार या योजनेअंतर्गत विविध अटी आणि शर्ती लागू करते.

देशातील गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMAY) आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये दिले जातात. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून लाभ घेतला किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले, तर त्याच्याविरुद्ध कठोर शिक्षा आणि दंड आकारला जाऊ शकतो.
सरकार या योजनेअंतर्गत विविध अटी आणि शर्ती लागू करते. जेणेकरून योजनेचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचेल. जे लोक फसवणूक करून पैसे घेतात त्यांच्यांकडून ते वसूल केले जातात. याशिवाय त्यांना तुरुंगातही जावे लागू शकते. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमांची माहिती जाणून घ्या.
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीने बनावट कागदपत्रे सादर केली किंवा चुकीची माहिती दिली, तर तो फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपात अडकू शकतो. यासाठी भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत शिक्षा होऊ शकते, ज्यामध्ये दंड आणि तुरुंगवास अशी दोन्ही शिक्षा असू शकतात.
एखाद्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याला दंडही भरावा लागू शकतो. दंडाची रक्कम स्थानिक अधिकारी ठरवतात आणि प्रकरणाच्या गांभीर्यावर अवलंबून असतात. प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा फसवणुकीने घेतल्यास जास्तीत जास्त 5 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, तसेच दंडही ठोठावला जाऊ शकतो. न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावली जाईल आणि गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार ती बदलू शकते.
जर कोणी बेकायदेशीरपणे पैसे घेतल्याचे सिद्ध झाले तर त्याला ते पैसे परत करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, व्यक्तीला भविष्यात अशा योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित केले जाऊ शकते. म्हणून, जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळवण्यात स्वारस्य असेल, तर तुम्ही योग्यरित्या अर्ज करणे आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळणे महत्त्वाचे आहे.