अम्फान चक्रीवादळाचं थैमान, मोदींचं ट्विट तर ममतांची ऑन द स्पॉट पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:36 PM2020-05-21T15:36:20+5:302020-05-21T16:12:45+5:30

पश्चिम बंगाल आणि ओडिशात बुधवारी चक्रीवादळाने थैमान घातले आहे. अम्फान असे या चक्रीवादळाचे नाव असून दोन्ही राज्यात मिळून जवळपास 72 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, नैसर्गिक साधनसंपत्तीचेही नुकसान झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल आणि ओडिशातील परिस्थितीबाबत ट्विट करुन केंद्र सरकार आपल्यासोबत असल्याचं म्हटलं आहे.

अम्फान चक्रीवादळामुळे झालेला नुकसान आणि हानी मी फोटोंच्या माध्यमातून पाहिली, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, या वादळाच्या कठिण परिस्थितीत संपूर्ण देश बंगालच्या पाठिशी असल्याचेही मोदी म्हणाले.

अम्फानमुळे दूरवस्था झालेल्या दोन्ही राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही मोदींनी दिले आहे.

अम्फान चक्रीवादळाची स्थिती आणि दिशेचा अंदाज लागल्याने चक्रीवादळ थडकण्याआधीच पश्चिम बंगाल आणि ओडिशातील किनारपट्टीलगतच्या 6 लाख 58 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करुन दोन्ही राज्यांच्या परस्थितीवर केंद्र सरकारचे लक्ष असून पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना मदतीचे आश्वासन शहा यांनी दिले आहे.

हावडा आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मीनाखान भागात झाडे कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. ओडिशातील पुरी, जगतसिंहपूर, कटक, केंद्रपाडा, जाजपूर, गंजम, भद्रक आणि बालासोर जिल्ह्यांतील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाच्या वेगाने बदलत असलेल्या स्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

मदत व बचाव कार्यासाठी ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये एनडीआरएफची 40 पथके तैनात करण्यात आली आहेत. कोविड-19 चा धोका ध्यानात घेऊनच एनडीआरएफला आत दुहेरी संकटाचा मुकाबला करायचा आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रस्त्यावर उतरुन पाहणी केली. अम्फानमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतानाचा त्यांचा फोटो व्हायरल होत आहे.