IAF Day 2020 : हवाई दलाचे प्रमुख म्हणाले, "आम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 01:37 PM2020-10-08T13:37:22+5:302020-10-08T14:03:26+5:30

नवी दिल्ली- भारतीय हवाई दलाचा आज ८८वा स्थापना दिवस आहे. १९३२ मध्ये ८ ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती, त्यामुळे हा दिवस ‘हवाई दल दिन’ म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्ताने गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हवाई दलाची ताकद पाहायला मिळाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी देशाला आश्वासन दिले की, हवाई दलाचे जवान प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहेत. आपल्या देशाच्या सार्वभौमत्व आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी ते नेहमीच तयार असतील.

सध्या आपल्या देशाला आणि हवाईदलाला सायबर आणि ड्रोनचा धोका यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांचा सामना करताना आपल्याला पुढे जावे लागेल, असे आरकेएस भदौरिया यांनी सांगितले.

एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाची तैनातीवरही आरकेएस भदौरिया यांनी भाष्य केले. यावेळी उत्तर सीमेवर नुकत्याच झालेल्या कारवाईच्या त्वरित प्रतिक्रियेसाठी मी सर्व हवाई दलाच्या योद्ध्यांचे कौतुक करतो, आपण कोणतीही घटना हाताळण्यासाठी अल्प कालावधीत लढाऊ विमाने तैनात केली, असे आरकेएस भदौरिया म्हणाले.

कोरोना काळात भारताने शेजारी राष्ट्रांना शक्य ती सर्व मत केली. हवाईदलाने आपल्या विमानांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचविले. याव्यतिरिक्त शेजारी राष्ट्रांना आपात्कालिन साहित्य आणि अन्य मदतही केली, असे आरकेएस भदौरिया म्हणाले.

हवाई दल शत्रूंना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासही सक्षम आहे. नुकत्याच हवाई दलात सामील झालेल्या राफेल लढाऊ विमाने, तसेच चिनूक आणि आपाचे हेलिकॉप्टर्सने हवाई दलाची ताकद वाढवली आहे, असे आरकेएस भदौरिया यांनी सांगितले.

याचबरोबर, आरकेएस भदौरिया म्हणाले, " येणारं दशक आव्हानात्मक आहे. आम्हाला सायबर हल्ला, ड्रोनद्वारे पाळत ठेवणे यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. मात्र, नेहमीसारखेच हवाई दलाचे जवान आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहेत."

दरम्यान, येथील आयोजित कार्यक्रमात एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग -29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे. यावेळी हिंडन एअरबेसवर थरारक प्रात्यक्षिके पाहायला मिळाली. विशेष म्हणजे राफेल लढाऊ विमान हे यंदाचे खास आकर्षण ठरले.

हिंडन एअरबेसवर फ्लाय पास्टची सुरुवात 'आकाशगंगा' म्हणजेच आकाशातून पॅरा-जम्पने झाली. या पॅरा-जम्पमध्ये हवाई दलाचे जवान ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमधून पॅराशूटच्या मदतीने उडी मारल्या. यानंतर निशान-टोली सह सैनिक मार्च पास्ट करण्यात आले.