कडक सॅल्यूट! IIT पासआऊट, जर्मनीत इंटर्नशीप; पण आवडलं नाही म्हणून UPSC करत 'ती' झाली IAS By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:30 AM 2022-12-06T11:30:37+5:30 2022-12-06T11:39:51+5:30
IAS Officer Garima Agrawal Success Story: असंख्य अडचणींवर मात करून काही जण यशाचं शिखर गाठतात. आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून सतत प्रयत्न करत असतात. भारतीय प्रशासकीय सेवा विभाग हा देशातील नोकरशाहीतील सर्वात प्रभावशाली विभाग मानला जातो. या विभागांतर्गत उमेदवारांना विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळते. पास झालेले उमदेवार हे जिल्हा स्तरावर ते विविध प्राधिकरणांमध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि आयुक्तपदावर सेवा बजावतात.
या सेवेत जाण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा (CSE) मध्ये लाखो उमेदवार आपले नशीब आजमावतात. यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परिक्षा आहे. यामध्ये प्रत्येकाला यश मिळतंच असं नाही. पण काही उमेदवार असेही असतात जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करतात.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. असंख्य अडचणींवर मात करून काही जण यशाचं शिखर गाठतात. आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून सतत प्रयत्न करत असतात. आयएएस अधिकारी गरिमा अग्रवाल याही अशाच उमेदवारांपैकी एक आहेत.
मध्य प्रदेशच्या खरगोनच्या गरिमा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयपीएस रँक मिळवली होती. पण त्यांचे लक्ष्य वेगळे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया...
गरिमा यांचे शालेय शिक्षण सरस्वती विद्या मंदिर, खरगोन येथून झाले. त्या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांची मोठी बहीण, प्रीती अग्रवाल यांनी 2013 मध्ये भारतीय टपाल सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. गरिमा यांनी शालेय जीवनापासून ते यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसपर्यंत प्रत्येक क्षेत्रात यश संपादन केले आहे.
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देण्यापूर्वी गरिमा यांनी आयआयटी हैदराबादमधून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर त्यांनी जर्मनीमध्ये इंटर्नशिपही केली. यानंतर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सीएसई परीक्षेत 240 वा क्रमांक मिळवला. मात्र, त्यांना आएएस व्हायचे होते. म्हणून त्यांनी पुन्हा तयारी केली.
त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात, त्यांनी 40 वी रँक मिळवली आणि 2018 मध्ये आयएएस अधिकारी बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण केले. यानंतर 2019-2020 मध्ये त्यांनी मसुरी येथे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांच्या यशाचा मंत्र सांगताना गरिमा या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणाऱ्या उमेदवारांना यूपीएससी पूर्व परीक्षा, मुख्य आणि मुलाखतीची तयारी एकत्रच करावी असं म्हणतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.