ICMR New Guidelines: ICMR ने निकष बदलले! आता कोरोना चाचणी नेमकी कुणाची करावी? नव्या गाइडलाइन्स जारी By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 10:06 AM 2022-01-11T10:06:33+5:30 2022-01-11T10:11:09+5:30
ICMR New Guidelines: वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणीचे निकष निश्चित करण्यात आले असून, ICMR ने काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातच आता देशभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णही वाढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
देशात कोरोनाची तिसरी लाट धडकत असल्याचे सांगितले जात आहे. सर्वच राज्यांत करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. अशावेळी कोरोना चाचण्यांबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMR ने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील नेमक्या कोणाची चाचणी करण्यात यावी, याबाबत यात निकष निश्चित करण्यात आले असून आणखीही काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याने ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट असे तिहेरी आव्हान पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.
रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचून चाचण्या केल्या जात आहेत. अशावेळी बदलत्या स्थितीत कोविड चाचणीबाबत खूप मोठा निर्णय ICMR ने घेतला असून नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
त्यानुसार कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याची आता आवश्यकता नाही. त्याऐवजी संपर्कातील हाय रिस्क गटात मोडणाऱ्या व्यक्तींचीच चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
याचाच अर्थ कोरोना बाधिताच्या संपर्कातील वृद्ध व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तीची चाचणीच चाचणी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. जी व्यक्ती लक्षणेविरहित आहे अशा व्यक्तीची कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण होम हायसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र गाइडलाइन्स निश्चित केल्या गेलेल्या आहेत. या गाइडलाइन्सनुसार उपचार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसेल व ही व्यक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करू शकेल, असेही नमूद करण्यात आले आहे.
ताप, खोकला, घसा दुखणे, जीभेची चव जाणे, गंध न येणे अशी लक्षणे असतील तर संबंधित व्यक्तीने कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे, असे ICMR ने स्पष्ट केले आहे. विदेशात जाणाऱ्या आणि विदेशातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी कोरोना चाचणी यापुढेही अनिवार्य राहील, असेही नमूद केले गेले आहे.
घरी होणाऱ्या चाचणीबाबत ICMR ने महत्त्वाची बाब स्पष्ट केली. त्यानुसार, घरी केलेली चाचणी निगेटिव्ह आली आणि तुम्हाला ताप, खोकला, घसादुखी अशी लक्षणे असतील तर ही चाचणी अंतिम मानू नये.
अशा व्यक्तीने आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी, असे नमूद करण्यात आले आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या आणि हाय रिस्क गटातील रुग्णाला वेगवान उपचार मिळावे, या उद्देशाने आयसीएमआरने ही पावले उचलली आहेत.