हरियाणा, महाराष्ट्रानंतर जर भाजपाने दिल्ली जिंकली...; देशाच्या राजकारणात हे बदल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:12 IST2025-02-06T14:07:01+5:302025-02-06T14:12:23+5:30
Delhi Election : गेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकांत भाजपाने दिल्ली सर केली होती. सर्वच्या सर्व खासदार भाजपाचे होते. परंतू, विधानसभेत दिल्लीत भाजपाला काही केल्या यश मिळत नव्हते. काँग्रेसचे पतन करण्यात नवखी आप यशस्वी ठरली होती, आणि विजय साधेसुधे नव्हे तर ७० पैकी बहुतांश जागांवर विजय मिळविणारे होते.

लोकसभा निवडणुकीतील अपेक्षित नसलेल्या यशानंतर भाजपाची देशभरात पिछेहाट होईल असा अंदाज विरोधी पक्षांसह राजकीय धुरिणांनी बांधला होता. परंतू, तो हरयाणा, महाराष्ट्राच्या निवडणुकांनी फोल ठरविला आहे. आता तर दिल्लीतही २६ वर्षांनी भाजपा सत्तेत येत असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे. असे झाले तर हा विजय देशाच्या राजकारणात मोठे बदल करणारा ठरणार आहे.
गेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकांत भाजपाने दिल्ली सर केली होती. सर्वच्या सर्व खासदार भाजपाचे होते. परंतू, विधानसभेत दिल्लीत भाजपाला काही केल्या यश मिळत नव्हते. काँग्रेसचे पतन करण्यात नवखी आप यशस्वी ठरली होती, आणि विजय साधेसुधे नव्हे तर ७० पैकी बहुतांश जागांवर विजय मिळविणारे होते. परंतू भाजपाला केजरीवालांनी पहिली संधी दिली ती कथित अबकारी घोटाळा करून.
दिल्लीत एकावर एक दारु बॉटल फ्री मिळू लागली, दारुवर प्रचंड मोठा डिस्काऊंट मिळू लागला होता. यावरून सुरु झालेले आरोप आप काही थोपवू शकली नाही. यानंतर शीशमहल घोटाळा बाहेर आला आणि केजरीवालांच्या इमेजला तडा गेला. आपच्या फ्रिबीजच्या स्कीमना तोड भाजपाला सापडत नव्हता, तो आपणहूनच केजरीवालांनी भाजपाला दिला. आता हिच निवडणूक देशाचे राजकारण बदलणारी आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरू लागल्याची चर्चा होत होती. परंतू, नंतर झालेल्या निवडणुकीत हरियाणा, महाराष्ट्रातील भाजपाला प्रचंड विरोधानंतरही प्रचंड विजय मिळविल्याने मोदींचे पर्व पुन्हा सुरु झाल्याचे दिसत आहे. याला दिल्ली काबीज करून मोदी पुन्हा जुन्या फॉर्मात आल्याचा संदेश देशात जाणार आहे. असे झाले तर २०२९ मध्येही मोदीच भाजपाचे नेतृत्व करणार हे नक्की होणार आहे. मोदींना निवृत्त करण्याची किंवा ते होण्याची योजना गुंडाळून ठेवली जाऊ शकते.
२०२४ च्या भाजपच्या कमकुवत प्रदर्शनानंतर काँग्रेसला आपण एकटाच मोदींना हरविण्यात यशस्वी होऊ, अशी जी भावना वाटत होती ती संपुष्टात येणार आहे. हरयाणात, महाराष्ट्रात काँग्रेसला त्यांचा हाच आत्मविश्वास घेऊन बुडाला आहे. इंडी आघाडीला सोबत घेऊनच निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. काँग्रेसला प्रादेशिक पक्षांना महत्व द्यावे लागणार आहे. नाहीतर येती बिहार, उत्तर प्रदेशच्या निवडणुकाही हातच्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे कदाचित काँग्रेसला आपला हेका सोडून दुय्यम भूमिका घ्यावी लागू शकते.
दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला जास्त मते मिळाली आणि जर ती आपच्या जागा पाडण्यासाठी पुरेशी ठरली तरी देखील याचे उलटे परिणाम पंजाबवरही होऊ शकतात. प्रादेशिक पक्षांवर याचे उलटे परिणाम होऊ शकतात. सध्या काँग्रेसला डावलून कोणत्याच राज्यात विरोधक लढू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे एनडीए एकजूट आहे. यामुळे कदाचित उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सपा, राजदला दचकून रहावे लागणार आहे.
दिल्ली विजयानंतर भाजपा वक्फ बोर्ड विधेयक मंजूर करून घेण्याबाबत मोठ्या हालचाली करू शकते. यासाठी एनडीएच्या पक्षांना जनता भाजपासोबत आहे, हे दाखवून देण्यासाठी ही निवडणूक भाजपाला महत्वाची आहे. याचा परिणाम बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवरही दिसणार आहे.
लोकसभा निवडणुकीत आरएसएसने निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अंग काढून घेतले होते. आम्हाला संघाच्या मदतीची गरज नाही, भाजपा आता आपल्या ताकदीवर पुढे जाऊ शकते, असे वक्तव्य अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले होते. याचा फटका लोकसभेला बसला, परंतू नंतर आरएसएस हरयाणा आणि महाराष्ट्रात सक्रीय झाली होती. दिल्ली विधानसभेतही संघाने मोठी मेहनत घेतली आहे. ऐन निवडणुकीपूर्वी संघाने ५० हजार ड्रॉईंग रुम चर्चा केल्या आहेत. लोकांना घराघरात जाऊन समजावले आहे. भाजपा का जिंकावी हे सांगितले आहे. दिल्ली निवडणूक संघाची गरज भाजपाला किती आहे, हे देखील दाखवून देणारी आहे.