'वंदे मातरम' म्हणा अन् 1 रुपयांत 1 लिटर पेट्रोल मिळवा, तेही गुजरातमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 02:06 PM2021-06-29T14:06:42+5:302021-06-29T14:15:09+5:30

गुजरातच्या वडोदरा येथील टीम रीव्हॉल्युशन या संस्थेने इंधन दरवाढीवर निषेध नोंदवण्यासाठी अनोखा मार्ग पत्करला आहे. ग्राहकांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळणार आहे.

मंगळवारी इंधनाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. 29 जूनपासून पेट्रोल 29 पैश्यांनी तर डिझेलची किंमत 28 पैश्यांनी वाढली आहे.

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरूच आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची ३५ पैसे दरवाढ केली आहे. या महिन्यात १४ वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे.

दरवाढीनंतर सात राज्यांची राजधानी असलेल्या शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. उच्चांकी दरांमुळे त्रस्त झालेल्या जनतेला मोदी सरकारकडून दिलासा मिळू शकतो.

सरकारकडून पेट्रोल, डिझेलवर करकपातीची शक्यता आहे. मुंबई पेट्रोलचे दर १०४.२२ रुपये प्रति लीटर झाले. तर डिझेलही ९६.१६ रुपये प्रति लीटरवर पोहोचले.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. दिल्लीत पेट्रोल ९८.११ रुपये तर डिझेलचे दर ८८.६५ रुपये प्रति लीटर झाले आहेत.

चेन्नईही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. चेन्नईत पेट्रोल ९९.१९ रुपये, तर डिझेल ९३.२३ रुपये प्रति लीटरवर पोहोचले. कोलकाता येथे पेट्रोल ९७.९७,

बंगळुरू येथे १०१.३९ आणि जयपूर येथे १०४.८१ रुपये प्रति लीटर झाले. पेट्रोलची शंभरी असलेल्या राजधानी असलेल्या शहरांमध्ये बिहारच्या पाटणा आणि केरळच्या तिरुवनंतपुरमचा समावेश झाला आहे.

लॉकडाऊनमुळे अगोदरच महागाईच्या खाईत सापडलेला सर्वसामान्य नागरिक इंधन दरवाढीमुळे तीव्र संताप व्यक्त करत आहे. केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी नानाविध पद्धतीने निषेध नोंदवल जात आहे.

गुजरातच्या वडोदरा येथील टीम रीव्हॉल्युशन या संस्थेने इंधन दरवाढीवर निषेध नोंदवण्यासाठी अनोखा मार्ग पत्करला आहे. ग्राहकांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळणार आहे.

पेट्रोल मिळविण्यासाठी एकच अट आहे. ग्राहकांनी वंदे मातरम आणि भारत माती की जयच्या घोषणा द्यायच्या आणि एक रुपयांत पेट्रोल डिझेल घेऊन जायचे.

टीम रीव्हॉल्युशन संस्थेने 300 लिटर डिझेल पेट्रोल वाटण्याचे जाहीर केले आहे. सोमवर सकाळी अकरा वाजल्यापासून ही योजना सुरू झाली आहे.

इंधन दरवाढीच्या निषेधात सामान्य नागरिक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख स्वेजल व्यास यांनी केले आहे.

एक लिटर पेट्रोलचे 300 कूपन विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. जो ग्राहक वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देईल, त्यांना एक रुपयांत पेट्रोल डिझेल मिळेल असेही त्यांनी सांगितले.