Corona Vaccination: अद्याप कोरोना लस घेतली नाही? पगारावर होणार थेट परिणाम होण्याची शक्यता; तयारी ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 09:43 AM2021-07-01T09:43:48+5:302021-07-01T09:58:50+5:30

Corona Vaccination: कोरोना लस न घेतल्याचा परिणाम थेट पगारावर होणार

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरण अभियानाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं जात असताना अद्यापही अनेकांनी लस घेतलेली नाही. आता ऑफिसला जायचं नाहीए, सध्या तर वर्क फ्रॉम होम सुरू आहे, अशी कारणं अनेक जण देत आहेत. तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुम्ही स्वत:चं मोठं नुकसान करत आहात.

कोरोना लस न घेतल्याचा परिणाम तुमच्या पगारावर, करिअरवर होऊ शकतो. कारण कंपन्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर 'लसवंत' व्हावं यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण बऱ्याच कंपन्यांना वर्क फ्रॉम होम बंद करून लवकरात लवकर कार्यालयं सुरू करायची आहेत.

कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावं यासाठी आता कंपन्या लसीकरण आणि पगाराचा संबंध जोडत आहेत. कंपन्या कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची सक्ती करू शकत नाहीत. त्यामुळे इंसेटिव्ह, कमीशन आणि इनक्रिमेंटच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होत आहे.

बहुतांश कंपन्यांना कार्यालयं पुन्हा सुरू करायची आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाशिवाय ते शक्य नाही. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी यासाठी कंपन्यांकडून विविध मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे.

लस न घेतलेले लोक बऱ्याच लोकांना संकटात टाकत आहेत. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी लस न घेतल्यास त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर होऊ शकतो, असा पवित्रा अनेक कंपन्यांनी घेतल्याचं खेतान एँड कंपनीचे भागीदार अंशुल प्रकाश यांनी सांगितलं.

बऱ्याच कंपन्यांनी लसीकरणाचा संबंध थेट पगारवाढीशी जोडला आहे. लसीकरण न केल्यास पगारवाढ विसरा, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

लस न घेण्याचं कोणतंही वैध आणि सबळ कारण नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ टक्के रक्कम कापण्यात येईल. जेव्हा ते लस घेतील, तेव्हा त्यांना ही कापलेली रक्कम मिळेल, अशा सूचना काही कंपन्यांनी दिल्या आहेत.

पुढील तीन ते चार महिन्यांत कार्यालयं सुरू करता यावीत आणि कोरोना संसर्गामुळे ती बंद करावी लागू नयेत यासाठी कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत.